श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये आयईडी स्फोटात जखमी झालेल्या लष्कराच्या दोन जवानांचे निधन झाले. तो स्फोट सोमवारी पुलवामा जिल्ह्याच्या अरीहल भागात झाला होता. लष्कराच्या गस्ती पथकाला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी तो स्फोट घडवला.
त्या स्फोटात नऊ जवान आणि दोन नागरिक मिळून अकरा जण जखमी झाले. स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोन जवानांना उपचारासाठी लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फेब्रुवारीत पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने पुलवामामध्ये भयंकर आत्मघाती हल्ला घडवला.
त्या दुष्कृत्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यामुळे मोठा तडाखा बसल्याने अस्वस्थ झालेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या कारवाया वाढवल्या आहेत.