डोर्लेवाडी, (वार्ताहर)- प्रति देहू समजल्या जाणाऱ्या डोर्लेवाडी ( ता. बारामती) येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. तुकोबांच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील हजारोच्या संख्येने वारकरी भाविक मंदिर परिसरात सहभागी झाले होते. यंदाचे बीज सोहळ्याचे ६५ वे वर्ष होते.
डोर्लेवाडी येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात हजारो भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ बीजेचा सोहळा अनुभवला. यावेळी मंदिरात टाळ-मृदंगाच्या तालात अखंड हरिनामाचा गजर सुरू झाला अन् ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष होताच उपस्थित हजारो भाविकांनी जड अंतःकरणाने श्रींच्या मूर्तीवर गुलाल पुष्पचा वर्षाव करून संत तुकाराम बीजेचा सोहळा साजरा केला. देवस्थान समिती व सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने बीज उत्सव सोहळ्यानिमित्त आठ दिवसांपासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते.
पहाटेच मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली होती. महाभिषेक झाल्यानंतर बाळासाहेब नाळे महाराज यांचे प्रवचन तर महाराज लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे कीर्तन झाले. दुपारी हरिनामाचा गजर करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील हजेरी लावली होती.
बीज उत्सवानिमित्त भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसरात ५० हजार स्कवेअर फुटांचा भव्य मंडप उभारला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, शुद्ध पाण्याची सोय केली होती. बारामती शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवला होता.
बीज उत्सवानिमित्त डोर्लेवाडीत मोठी यात्रा भरते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोठमोठे पाळणे दाखल झाले होते. तरुण मुलांनी आणि मुलींनी गर्दी केली होती. कुस्त्या व ईगल स्पोर्ट क्लबच्या वतीने ३५ आणि ५० किलो गटात कबड्डीचे सामने देखील भरवले होते.