पारगाव शिंगवे- पारगाव (ता. आंबेगाव) येथे प्रतिभीमाशंकर म्हणून समजल्या जाणाऱ्या त्रिवेणी संगमावर असलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिरात महाशिवत्रीनिमित्त हजारो भाविकांनी रांगेत देवाचे दर्शन घेतले. संगमेश्वर परिसर शिवभक्तांनी फुलून गेला होता. महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील अनेक गावांमधील भाविकांनी पहाटेपासून देवाच्या दर्शनासाठी भाविक आले होते.
सकाळी संगमेश्वरच्या पिंडीस रुद्राभिषेक करण्यात आला. देवास हार-तुरे आदी धार्मिक कार्यक्रम झाले. तालुक्याच्या पूर्वभागातील प्रतिभीमाशंकर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिर हे घोडनदी, मीनानदी आणि दक्षिण गुप्तगंगेच्या त्रिवेणी संगमावर असलेले प्राचीन मंदिर आहे. निसर्गरम्य हिरव्या शालूने हा परिसर नटलेला आहे. या परिसराचा कायापालट शिवयोगी शैलेजमहाराज यांनी केला आहे.