पुणे शहरातील कचरा घाटाच्या पायथ्याला : संबंधित प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष
दिवे- दिवे घाट परिसरात वाहनचालक प्रचंड प्रमाणात राडारोडा आणून टाकत आहेत. त्यात पुणे शहराजवळील हॉस्पिटलमधील कचरा या घाटात टाकला जात असल्यामुळे घाटातील जैवविविधता धोक्यात आली आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून होत आहे. घाटात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
पुणे आणि सासवडला जोडणारा मुख्य रस्ता दिवे घाटातून आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा याच दिवे घाटातून जातो. शतकोत्तर परंपरा असलेल्या या घाटाची हेळसांड होत आहे. या मार्गासाठी राजकर्त्यांनी आश्वासनांची खैरात केली आहे. परंतु बोलाचीच कडी अन् बोलाचाच भात, अशी अवस्था झाली आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, नारायणपूर, कानिफनाथगड, केतकावळे येथील बालाजी मंदिर, भुलेश्वर मंदिर, मल्हारगड, पुरंदर किल्ला आदी अनेक पर्यटनस्थळांना भेटी देणारे पर्यटक दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे दिवे घाटातील वर्दळ वाढली आहे.
दिवे येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा टेस्ट ट्रॅक आहे. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. परिणामी घाटात ठिकठिकाणी पडलेल्या राडारोड्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. या धोकादायक दरडी प्रवाशांच्या मुळावर उठण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात दरडीमध्ये पाणी शिरते. उन्हाळ्यात तापमानामुळे त्या कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- दिवे घाटात राडारोड्याबरोबरच मृत जनावरे, कोंबड्या टाकल्या जात आहेत. या दुर्गंधीचा प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
– मोहन अनंता झेंडे, वाहन चालक.