ज्योती मांढरेचा अर्ज येणार रेकॉर्डवर; पुढील सुनावणी 5 मार्चला
सातारा – संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगला जेधे यांचा इंजेक्शन देऊन खून करून आनंद व्यक्त केला होता. त्याने जेधेंच्या अंगावरील सोने व रोकडही लुटली होती, अशी साक्ष वाई-धोम खूनसत्राच्या खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने मागील वेळच्या सुनावणीत सातारा जिल्हा न्यायालयात दिली होती.
मात्र, हे खूनसत्र उघडकीस आल्यानंतर वाईचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचा अर्ज ज्योतीने तत्कालीन मुख्यमंत्री, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांना अर्ज केला होता, अशी कबुली तिने आज न्यायालयात दिली. त्याचबरोबर तो अर्ज संतोष पोळच्या सांगण्यावरून केल्याचेही तिने सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वाई-धोम खूनसत्राच्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून ते आज न्यायालयात उपस्थित होते. या खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची साक्ष पुढे झाली. ती म्हणाली, आम्ही खून केलेल्या सलमा यांची मैत्रीण ज्युलीला
दि. 1 जुलै 2016 रोजी मी संतोषच्या सांगण्यावरून मंगला जेधे यांच्या फोनवरून फोन केला. तेव्हा ज्युलीसोबत माझे वडील बोलले होते. त्यानंतर जेधेंचा मोबाइल मी संतोषला परत दिला होता. त्यानंतर मी व संतोष भुईंज येथे दुचाकीवरून आलो. ती दुचाकी एका ठिकाणी उभी करून आम्ही दोघे ठाण्याला गेलो होतो. तेथे आम्ही “अप्पर स्टे हाऊस’ या हॉटेलमध्ये दोन दिवस राहिलो होतो. त्यानंतर आम्ही मुंबईला जाऊन धर्मशाळांमध्ये राहिलो होते. मुंबईतून आम्ही दि.10 ऑगस्ट 2016 रोजी वाईला आलो.
धनादेश न वटल्याचा खटला संतोषविरोधात पुणे न्यायालयात सुरू होता. त्या खटल्यात अटक वॉरंट असल्याने आम्ही पुण्याला निघालो होतो. त्यावेळी मंगला जेधेंच्या खुनाच्या संशयावरून पोलीस आपल्या मागावर असल्याचे संतोषने मला सांगितले. वाईचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे पत्र मी संतोषच्या सांगण्यावरून त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवले होते. त्याच दिवशी मला वाई पोलिसांनी अटक केली.
ज्योतीने केलेले अर्ज, संतोषसोबत ती राहिलेल्या हॉटेलमधील नोंदीची प्रत न्यायालयाच्या समोर यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. मात्र, पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून आता आणखी तपास पोलिसांना आता करता येणार नाही, असा आक्षेप बचाव पक्षाने घेतला. यावर निकम यांनी आंध्र प्रदेशातील एक खटल्याचा दाखला देत, माफीचा साक्षीदार ज्योती सांगत असलेल्या गोष्टींची सत्यासत्यता पडताळायची असेल तर त्या गोष्टी न्यायालयाच्या समोर यायलाच पाहिजेत, असा युक्तिवाद केला. त्यावर हे पुरावे पुढील सुनावणीवेळी हजर करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला. या खटल्याची पुढील सुनावणी 5 मार्चला होणार असल्याची माहिती ऍड. उज्ज्वल निकम यांनी दिली.
पोळला घ्यायचीय ज्योतीची उलटतपासणी
ज्योतीने “लास्ट सीन’बाबत दिलेल्या जबाबावर संतोष पोळ याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या मुद्द्यावर ज्योतीची उलटतपासणी घेण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली. त्याला सरकार पक्षाने तीव्र विरोध केल्यानंतर न्यायालयाने ही मागणी फेटाळली. या खटल्यात साक्षीदार असलेल्या लोकांना पोलीस निरीक्षक विनायक वेताळ धमकावत असल्याची तक्रारही संतोषने केली होती. त्यावर न्यायाधीशांनी वेताळ यांना समज दिली.