अलीकडे करमणुकीसाठी वेबसीरीज, शॉर्ट फिल्म्स असे अनेक पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध झाले आहेत. नुकतीच मी एक वेगळ्या विषयावरची वेबमाला पाहिली. तिचं नाव “द केस’. काय आहे ही केस? केस अगदी नवीन, अपवादात्मक. भारताच्या संरक्षणमंत्री श्रद्धा पंडित यांची इच्छा आहे की, स्पेशल फोर्सेस कमांड कोर्समधे शिखा शर्मा या मुलीला प्रवेश द्यावा. सुरुवातीलाच हे दृश्य दिसते. लष्करातल्या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांपुढे संरक्षणमंत्री हा प्रस्ताव ठेवतात. हे अधिकारी त्यास तयार होत नाहीत. पण मंत्री म्हणतात, “ही आपण टेस्ट केस आहे असं समजू.’ शिखा शर्माचं करिअर उत्तम आहे.
उत्कृष्ट ऍथलेट, पळण्याच्या शर्यतीत बक्षिसे मिळवलेली… नाइलाजाने मिलिटरी अधिकाऱ्यांना यास होकार द्यावा लागतो.
आता ट्रेनिंगला निघालेल्या निवडक जवानांना आणि त्यांच्याबरोबरच शिखा शर्मा या मुलीला घेऊन बस डोंगराळ भागातून कॅंपकडे निघालेली. पोचल्यावर सुरुवातीलाच एक पाटी दिसते. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेले दिसते, “वी मेक मेन, आऊट ऑफ बॉइज’! शिखा शर्मा ती पाटी वाचते. या क्षेत्रात बाई कधी असणारच नाही हे किती गृहीत धरलं गेलंय… आपल्या मनात येतं.
मग ह्यांचे खडतर ट्रेनिंग सुरू होते. पुरुषांच्यासुद्धा शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारे कठीण व्यायाम घेतले जातात. शिखा शर्मा मुळीच न डगमगता जिद्दीने उत्तम कामगिरी करून दाखवते. आपल्या अंगी उत्तम कौशल्य आहे, चिकाटी, बुद्धिमत्ता आहे याची तिला पूर्ण जाणीव आहे. ती कुठेतरी आपल्यापेक्षा कमी पडावी, स्त्री म्हणून तिच्या मर्यादा स्पष्ट व्हाव्यात अशी तिच्या काही सहकाऱ्यांची इच्छा आहे. पण तिचे लक्ष फक्त आपल्या ध्येयावर आहे. पहिल्या तीनात तिचा कायम क्रमांक असतो. सरावासाठी वेगवेगळ्या कामगिरीवर त्यांना पाठवताना कुणा एकावर टीम लीडरची जबाबदारी सोपवली जाते. आपल्याला ती संधी मिळावी म्हणून शिखा त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कसोट्या उत्तम रीतीने पार पाडते. आणि मग ती होते लीडर… तिच्या नेतृत्वाखाली या साऱ्या पुरुष जवानांना पाठवले जाते.
पिढ्यान्पिढ्या रक्तात भिनलेला पुरुषी अहंकार! या मोहिमेमधे तिला सतत आव्हान दिले जाते. तिच्या निर्णयांवर काही सहकाऱ्यांकडून शंका घेतली जाते. अर्थात वरिष्ठांच्या आज्ञा पाळण्याची सक्त ताकीद असते. त्यामुळे बहुतेकांकडून तिला चांगले सहकार्य मिळते. दरम्यान त्यांचा मुख्य कार्यालयाशी संपर्क तुटतो. ती ठामपणे मोहीम यशस्वी करते. लष्कराकडून ही एक ट्रायल घेतलेली असते. एक छोटासा बॉंबही यांच्या आसपास टाकला जातो. काही थोडे जखमी होतात. जखमींना हॉस्पिटलमधे ऍडमिट केलं जातं. लक्षात असं येतं की, शिखा शर्माच्या जखमा या केवळ अपघाताच्या नाहीत.
“द केस’ या मालिकेचे एकूण सात भाग आहेत. इथून पुढे आपली उत्सुकता आणखी ताणली जाते. काय झालेलं असतं नेमकं? शिखा शर्मावर शारीरिक अत्याचार झाले असल्याचं चौकशीत पुढे येते. पण हे ती स्वतःच नाकारते. दरम्यान एक निनावी पत्र या अधिकाऱ्यांना मिळतं. त्यात शिखावर टीममधल्याच एकाकडून बलात्कार झाल्याचं लिहिलेलं. मग आणखी कसून तपासणी सुरू होते. मेजर इम्तियाज हुसेन (अनुप सोनी) स्वतः येतात. खूप बारीकसारीक तपशील जमा केल्यावर हेच सत्य पुढे येतं की, बॉम्बमुळे किंवा अपघातात शिखा शर्माला जखमा झालेल्या नसून तिच्यावर शारीरिक अत्याचारच झालेला आहे. आता हे कृत्य कोणी केले एवढे तिने सांगावे यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो.
शिखा शर्माची जबरदस्त भूमिका निमरत कौर या समर्थ अभिनेत्रीने उभी केली आहे. शिखाची हुशारी, तिची मेहनत तिनं सर्वांगानं पडद्यावर पेश केली आहे. जणू ती खरोखरीच एक लष्करी कमांडो आहे असे तिला पाहताना वाटते. संरक्षण मंत्र्यांच्या छोट्याशा भूमिकेत जूही चावला भाव खाऊन जाते. या मालिकेचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांचे आहे. मिनिटामिनिटाला अवघड प्रसंग पुढे धावत राहतात. आपण जराही नजर न हलवता खिळल्यासारखे पाहत राहतो.
अखेरीस शिखा शर्मा असा अत्याचार झाल्याचे मान्य करते पण ती सांगते की, मी टेस्ट केस आहे. माझ्या अनुभवावरून लष्करातील स्त्रियांच्या सहभागाबाबतचे पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. तेव्हा मी हेच सिद्ध करेन की, स्त्री स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकते आणि जो कोणी तिच्या वाटेला जाईल, त्याला अद्दल घडवू शकते. मग ती मोठ्या युक्तीने झालेल्या प्रकाराची कबुली देताना त्या जवानाचा मोबाइलवर व्हिडिओ घेते. इतकेच नव्हे तर त्याच्याशी एका सामन्यात समोरासमोर शारीरिक ताकदीमधेही त्याला हरवते आणि सगळ्यांमधे वरचढ ठरते. शेवटी अर्थातच तिची उत्कृष्ट कॅडेट म्हणून निवड होते. आणि लष्करातील भरतीची वाट पुढील स्त्री उमेदवारांसाठी ती खुली करते.
“द केस’ मालिका आवर्जून पहायला हवी. बारकाईने पाहिलीत तर दिग्दर्शकाने पेरलेल्या अनेक सूचक जागा तुमच्या लक्षात येतील आणि एक उत्तम कलाकृती पाहिल्याचं समाधान तुम्हाला मिळेल.
माधुरी तळवलकर