बाहुबलीच्या यशानंतर प्रसिद्धीझोतात आलेला मेगास्टार प्रभासच्या “राधे श्याम’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाची पटकथा एका प्रेमकथेवर आधारित असून बाहुबली फेम प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
या चित्रपटाच्या पोस्टरनंतरच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर 14 फेब्रुवारीला रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्णा कुमार यांनी केले असून तो विविध भारतीय भाषांत प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग गतवर्षी मे महिन्यात पूर्ण झाले होते.
पण लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले. त्यामुळे आता या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार आहे. “राधे-श्याम’ ही युरोपमधील एक महाकाव्य प्रेमकथा असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडेसह सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूरसहीत इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे.
या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. प्रभास चित्रपटात एका टेलरची भूमिका साकारत आहे, तर पूजा हेगडे राजकुमारीच्या भूमिकेत दिसू शकते. चित्रपटाच्या कथेबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी खूपच गुप्तता पाळल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादसह युरोपममध्ये अनेक ठिकाणी करण्यात आले आहे. याशिवाय या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण जॉर्जियात करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दाटली आहे.