पुणे – पालिकेच्या ऑनलाइन मुख्य सभेला विरोध करत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने महापौर कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. तर,”जोपर्यंत राज्य सरकारकडून स्पष्ट आदेश येत नाही तोपर्यंत सभेचे कामकाज हे ऑनलाइनच चालवले जाणार,’ असे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुख्यसभेचे कामकाज “ऑनलाइन’ घ्यायचे की “ऑफलाइन’ घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने सोमवारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. “हे कामकाज सभागृहात घ्या’ अशी मागणी करत विरोधक सदस्य भाजपविरोधात घोषणाबाजी करत थेट सभागृहात गेले. “मात्र तेथे जाऊन उपयोग नाही महापौर कार्यालयात जाऊ,’ असे म्हणून सगळेच महापौर कार्यालयात गेले.
यामध्ये आमदार चेतन तुपे पाटील, दिलीप बराटे, विशाल तांबे, प्रशांत जगताप, भैय्यासाहेब जाधव, अजित दरेकर आदी नगरसेवकांचा समावेश होता.
सोमवारी महापालिकेची विशेष सभा आयोजित केली होती. ती ऑनलाइन पार पडली, शिक्षण समिती स्थापन करण्याचा विषय मंजूर करून सभा तहकूब केली गेली. तत्पूर्वी विरोधी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत ही सभा ऑफलाइन घेण्याची मागणी केली. येथील बैठक हॉलचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दार जोरात वाजवून महापौर बसलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे सर्व जण महापौर कार्यालयात ठाण मांडून बसले अन् भाजपविरोधात घोषणाबाजी केली.
“भ्रष्टाचार लपवण्यासाठी कामकाज ऑनलाइन घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. तसेच सरकारकडून आदेश आल्यानंतरही ही सभा ऑनलाइन घेतली जात आहे,’ याचा निषेध करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
काही वेळानंतर विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आदींनी महापौर कार्यालयात ठाण मांडले. सभागृह नेते गणेश बीडकर यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथे शाब्दिक वाद झाला. अखेर सभा सोडून महापौर बाहेर न आल्याने आंदोलक सदस्य निषेध करून तेथून निघून गेले.
ऑनलाइन सभेसाठी 2 लाखांचा खर्च
मुख्य सभेच्या कामकाज हे “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सभागृह’ येथे केले जाते. परंतु, या विशेष सभेचे कामकाज पंधरा क्षेत्रीय कार्यालये, मुख्य इमारतीमधील पदाधिकाऱ्यांची आणि पक्षांची कार्यालये, समिती सभागृहाच्या हॉलमध्ये दृकश्राव्य माध्यमांतून चालवण्यासाठी यंत्रणा उभी केली गेली. यामध्ये इंटरनेट कनेक्शन, टीव्ही, कॅमेरा असलेला माइक आदी उपकरणे बसवण्यात आली. तसेच तीन ठिकाणी एलएडी स्क्रीन बसवली गेली. प्रत्येक टीव्हीसाठी पाच हजार, तर ओव्हेर हेड प्रोजेक्टरसाठी 10 हजार रुपये भाडे देण्यात आले होते. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हे काम देण्यात आले. याचा खर्च सुमारे दीड ते दोन लाख रुपये इतका केला आहे, असे सूत्रांनी सांगितले.