आमदार अशोक पवार यांची ग्वाही ः वडगाव रासाई येथे जनता दरबार
मांडवगण फराटा- तहसील कार्यालयात दलालगिरी वाढली आहे. ही दलालगिरी आळा घालणार आहे. तसेच जनता दरबाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.
वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे शिरूर तहसील कार्यालयाच्या वतीने गुरुवार (दि. 6) जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पवार बोलत होते. यावेळी कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे, ज्ञानदेव यादव, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, बांधकाम विभागाचे राहुल सोनवणे, विश्वास कोहकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेक र, वडगाव रासाईच्या सरपंच निर्मला ढवळे, उपसरपंच सुरेश चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष सचिन पवार, ग्रामसेवक राजाराम रासकर आदी उपस्थित होते.
नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा
जनता दरबारात महसूल, पुरवठा विभाग, महावितरण, पंचायत समिती, पीएमआरडीए संदर्भातील तक्रारींचा पाढा नागरिकांनी आमदार अशोक पवार अधिकाऱ्यांसमोर वाचला. तसेच तक्रारी व भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यासाठी आमदार अशोक पवार यांना वडगाव रासाई, न्हावरा व तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटातील चार गावांतील नागरिकांनी अक्षरशः गराडा घातला. यावेळी विविध योजनेतील काही लाभार्थींना शिधापत्रिका, दाखले व धनादेशाचे वाटप करण्यात आले. उद्घाटनावेळी आमदार पवार यांनी शासनाच्या प्रत्येक विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांची ओळख नागरिकांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश ढवळे यांनी केले.
- दिव्यांग मुलीला घेतले दत्तक
अपेक्षा नंदकुमार नलगे या दिव्यांग मुलीला महसूल नायब तहसलीदार ज्ञानदेव यादव यांनी दत्तक घेतले आणि तिच्या संपूर्ण शालेय शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी घेतली. - एकूण दाखल प्रकरणे- 5560
परिवहन विभाग-35 प्रकरणे
7/12 दुरुस्ती -27 प्रकरणे
महावितरण प्रकरणे-प्राप्त -115
पंचायत समिती विभाग -1966 प्रकरणे
आरोग्य विभाग -1716 प्रकरणे
घोडबंधारे -4 प्रकरणे
वनविभाग -136 प्रकरणे
कृषी -365 प्रकरणे
पीएमआरडीए -350 प्रकरणे