नवी दिल्ली : अनिवासी भारतीय व्यावसायिक सी.सी.थंपी यांना आज दिल्ली येथील एका न्यायालयाने भारताबाहेर प्रवास करण्याची परवानगी दिली. सी.सी.थंपी हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणातील आरोपी असून त्यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाला होता. मात्र या सशर्त जामिनामध्ये त्यांना देशाबाहेर प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलेली. दिल्ली न्यायालयाने आज ही बंदी उठवल्याने त्यांना देशाबाहेर प्रवास करता येणार आहे. न्यायालयाने थंपी यांना आंतराराष्ट्रीय प्रवासाची परवानगी दिली असली तरी मनी लॉण्डरिंग प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करू नये अशी तंबी दिली आहे.
तत्पूर्वी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अनिवासी भारतीय व्यावसायिक सी.सी.थंपी यांना अटक केली होती. ईडीच्या जाळ्यात आलेल्या थंपी यांची दुबईत स्काय लाईट नावाची कंपनी आहे.
त्या कंपनीने सध्या फरार असलेला शस्त्रास्त्र विक्रेता संजय भंडारी याच्या कंपनीकडून लंडनमध्ये एक फ्लॅट विकत घेतला. तो फ्लॅट नंतर वढेरा यांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावरून वढेरा आणि भंडारी यांच्याविरोधात परदेशात मालमत्तेचा अवैध व्यवहार केल्याच्या आरोपावरून मनी लॉण्डरिंगची चौकशी सुरू आहे.
त्या प्रकरणात याआधी चौकशीला सामोऱ्या गेलेल्या थंपी यांनी लंडनमधील फ्लॅटमध्ये वढेरा राहिले होते, असा दावा केला होता. मात्र, तो दावा वढेरा यांनी फेटाळून लावला होता.