सातारा -जिल्हा परिषदेमध्ये परिविक्षाधीन सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विशाल सुरेश क्षीरसागर (रा. इर्ला ता. जि. उस्मानाबाद) यांची राज्य सेवा परीक्षेत पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाली आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या क्षीरसागर यांनी कोणत्याही क्लासशिवाय हे यश मिळवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
क्षीरसागर यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत इर्ला येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून 2018 मध्ये वर्षभर सेवा बजावली. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली. सध्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्रोबेशनल म्हणून काम सुरु होते. यादरम्यान त्यांनी राज्य सेवा परीक्षा दिली होती. कसलाही क्लास न लावता अभ्यास करून क्षीरसागर यांनी उपअधीक्षकपदी यश मिळवले.
या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या यशाचे श्रेय आई- वडिलांना असून परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते, अशी प्रतिक्रिया विशाल क्षीरसागर यांनी व्यक्त केली.