बीएमसीसी महाविद्यालयात दिव्यांगांमध्ये प्रथम
पुणे – बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स अर्थात बीएमसीसीच्या बारावी निकालात दिव्यांग विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश मिळविले आहे. जन्मतः दृष्टीहीन असलेल्या प्रणितकुमार गुप्ता या विद्यार्थ्याने बारावी वाणिज्य शाखेत 86.46 टक्के गुण मिळवत महाविद्यालयात दिव्यांगामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
बीएमसीसीच्या दिव्यांग निकालात श्रुती बांठीया या विद्यार्थिनीने 84 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. तर देवांशू गाणोरकर याने 73 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रणितकुमारला जन्मतःच अंधत्व आले. तो दहावीमध्ये 96 टक्के गुण मिळवत प्रथम आला होता. त्यामुळे पालकांनी पुढील शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. मागील दोन वर्षांपासून प्रणितकुमार हा बीएमसीसी महाविद्यालयातील वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. पूर्ण अंधत्व असल्याने तो पुस्तके रेकॉर्ड करून अभ्यास करत असे.
अभ्यासाबरोबर प्रणितकुमारने तबला वादनाचा छंद जोपासला. तबला वादनाची आवड आणि सराव यामुळे त्याला गतवर्षी बालश्री राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.
सीए व्हायचं आहे…
बारावीसाठी खासगी क्लासेस लावले नव्हते. माझ्या नावे हैदराबाद येथे गणिताचे सहा रेकॉर्ड नोंदविण्यात आलेले आहेत. पुढील काळात मी बी-कॉम करतानाच चार्टर्ड अकाऊंटंटची तयारी सुरू करणार आहे. सी.ए. होण्याचे ध्येय आहे.