“तपोवन’ प्रश्नी शांत बसणार नाही

नगर -तपोवन व बोल्हेगाव रस्त्याच्या कामात झालेला मोठा भ्रष्टाचार शिवसेने उघडकीस आणला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारी मुळे आता या कामाची तपासणी करण्यासाठी पथक आले आहे. तपोवन व बोल्हेगाव या दोन्ही प्रमुख रस्त्यांचे काम परत पहिल्या पासून सुरु होई पर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, असे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होत असलेल्या तपोवन व बोल्हेगाव रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी करत कामाची चौकशी व तपासणी करण्याची तक्रार सरकार कडे केली होती. त्यानुसार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, पुणे कार्यालयाने या कामांची चौकशी व दर्जाची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी (नागपूर) यांनी तपोवन रस्त्याची पाहणी केली. यावेळी आकाश कातोरे यांनी बोल्हेगाव रस्त्याची झालेली दुरवस्था तपासी अधिकारींना दाखवली.
यावेळी शिवसेनेचे मदन आढाव, निलेश भाकरे, अंबादास शिंदे, रमेश वाकळे आदींसह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बोल्हेगाव रस्त्याची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. मुख्यमंत्री निधीतून या रस्त्यासाठी मिळालेल्या मोठ्या निधीतून दर्जेदार रस्ता होणे अपेक्षित होते. मात्र, या ठेकेदाराने कामात मोठा भ्रष्टाचार करून अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता केला आहे.
पहिल्याच पावसात नवा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्याची पूर्ण चाळणी झाल्याने नागरिकांची मोठी कसरत होत आहे, असे कातोरे यांनी सांगितले.कळमकर म्हणाले की, शिवसेने केलेल्या सततच्या पाठपुरावा व प्रयत्नातून तपोवन रस्त्या व बोल्हेगाव रस्त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून मोठा निधी मिळाला. मात्र, त्यांनी या कामाचे श्रेय लाटण्याबरोबरच ठेकेदाराशी संगमत करत आणखी काय काय लाटले हे सर्वांना माहिती आहे.





