येरवडा, दि. 27 (प्रतिनिधी) -ढोले पाटील रस्ता येथील महापालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळेत गेल्या आठ दिवसांपासून पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. नैसर्गिक विधी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायंकाळी थेट क्षेत्रीय कार्यालयच गाठले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यी आल्याने क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी गोंधळून गेले.
ताडीवाला भागातील या शाळेत गोरगरीब पालकांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेली आठ दिवस पाणी नसल्यामुळे शौचालये स्वच्छ करता आलेली नाहीत. या शाळेमध्ये अनेक समस्या असून त्या सोडविण्याकडे पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. अनेक वेळा शाळेच्या प्रशासनाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले. परंतु, कोणतीच कार्यवाही अधिकाऱ्यांकडून केली जात नाही. यामुळे अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भिम छावा संघटनेच्या वतीने ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात या शाळेतील विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधीसाठी आणले होते.
येथील पाण्याच्या मोटार नादुरुस्त झाली असल्याने समस्या निर्माण झाली होती. ती रात्रीतून दुरुस्त करण्यात आली. यामुळे शाळेचा पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. यापुढे तातडीने कार्यवाही करून शाळेत पाणी टंचाई होऊ दिली जाणार नाही.
– ज्ञानदेव सुपे, सहायक आयुक्त, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय