ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, असा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न
आवश्यक कागदपत्रे शासकीय यंत्रणेकडून वेळेत मिळत नसल्याने अडचणी
पुणे – पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख
25 ऑगस्टपर्यंत आहे. ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रे शासकीय यंत्रणेकडून वेळेत प्राप्त न झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.
सध्या दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम अर्थात पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास आणखी तीन दिवसांचा अवधी आहे. अशा परिस्थितीत करोनाचे संकट लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
ऑनलाइन अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र सादर केल्याची “पोहोपावती’वरून अर्ज सादर केला. पण तसा अर्ज स्वीकारले जात नाही. त्यामुळे आपण प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी चिंता वाटत आहे. शासकीय कार्यालय सुरू आहेत. मात्र, वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अर्जास विलंब होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर केल्याची पोहोचपावतीवरून अर्ज करता येणार नाही. तशी यंत्रणा नाही. त्यामुळे मूळ प्रमाणपत्राशिवाय अर्ज करता येणार नाही. मात्र, सध्या करोना संसर्गाचा विचार करता प्रवेशासाठी आणखी काही दिवस मुदतवाढ देण्याची शक्यता तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.