सातारा – एसटीची दुचाकीला धडक बसल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या कल्याणी देशमुख या गर्भवती विवाहितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज चौथ्या दिवशी संपली. कल्याणी यांच्या अपघाती मृत्युमुळे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने खाजगी रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, या घटनेबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी एका सामाजिक कार्यकर्त्याने संपर्क साधला असता, सरकार स्थापन होईपर्यंत आपण काही करू शकत नाही, असे धक्कादायक उत्तर त्यांनी दिले. एसटीचे अधिकारी जखमीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयाकडे फिरकले नाहीत. त्यानंतर मंत्र्यांनीही बेजबाबदारपणे उत्तर दिल्याने मृताच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
कल्याणी देशमुख (वय 25, रा. नांदगाव, ता. सातारा) या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्या सोमवारी (दि. 4) रोजी सकाळी पती वैभव यांच्यासोबत सोनोग्राफीसाठी निघाल्या होत्या. ते दोघे महामार्गावरून जात असताना सातारानजीक खिंडवाडी येथे एसटी चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने एसटी बस विरुद्ध बाजूच्या लेनवर गेली. त्यावेळी बसने देशमुख यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात देशमुख दाम्पत्य गंभीर जखमी झाले.
त्यांना सातारा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून कल्याणी देशमुख यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अपघातानंतर गेल्या तीन दिवसांत एसटीचे अधिकारी देशमुख दाम्पत्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फिरकले नाहीत. देशमुखांच्या नातेवाइकांनी एसटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना दाद देण्यात आले नाही. देशमुख कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बेताची असून जखमी वैभव देशमुख हे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी पैसे जमवून रुग्णालयाचे बिल भागवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, रोज पैशांचा भरणा करावा लागत असल्याने त्यांनाही मर्यादा आल्या. कल्याणी देशमुख यांची प्रकृती गुरुवारी सकाळी बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर देशमुख कुटुंबीयांनी एसटीच्या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. एसटी महामंडळाचे अधिकारी हॉस्पिटलमध्ये येणार नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सातारच्या विभाग नियंत्रकांना व इतर अधिकाऱ्यांना फोन लावला. गर्भवती महिलेची प्रकृती नाजूक असल्याने कुलकर्णी यांनी बुधवारी परिवहन मंत्री दिवकार रावते यांच्याशी संपर्क साधला होता. देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची विनंती कुलकर्णी यांनी केली; परंतु सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत आपण काही करु शकत नाही, असे उत्तर रावते यांनी दिल्याचे कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिींना सांगितले. रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण झाल्यानंतर अखेर एसटीच्या अधिकारी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन मदत करण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.