रस्त्यावर भरणारा बाजार जीवघेणा ठरणार

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज


मास्क, सॅनिटायझरचा वापर न करता व्यवसाय : ग्राहकांचीही झुंबड

पुणे – शहरात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणे हा करोनावरचा एकमेव उपाय असतानाही विविध रस्त्यांवर होत असलेल्या भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विक्रीमुळे प्रचंड गर्दी होत आहे. तेथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या प्रकारांमुळे सोसायट्यांची डोकेदुखी वाढली आहे. महापालिका आणि पोलिसांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी सोसायट्यांचे पदाधिकारी करत आहेत.

मार्केटयार्ड भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा आणि केळी विभाग सुरू झाला आहे. बाजार परिसरात प्रशासन, आडते, हमाल, तोलणार सर्व प्रकारची खबरदारी घेत आहेत.

असे असताना कात्रज चौक, कात्रज आंबेगाव रस्ता, कात्रज खडीमशीन चौक रस्ता, वडगाव पूल, फातिमानगर चौक, राजाराम पुल, दांडेकर पूल, गंगाधाम चौक, कोंढवा, गंगाधाम चौक ते इस्कॉन मंदिर चौक, कोथरूड, कर्वेनगर, वारजे ते एनडीए रस्ता, सातारा रस्ता आदी ठिकाणी रस्त्यांवर कोणत्याच प्रकारची खबरदारी न घेता सर्रासपणे भाज्या आणि फळांची विक्री सुरू आहे. अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या समोर विक्री केली जाते. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होते. आरडाओरडा होतो. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, अशा तक्रारी होत आहेत.

गंगाधाम चौक ते इस्कॉन मंदिर रस्त्यावर भाज्या, फळांचा बाजार भरतो. वाहने आणि हातगाडे रस्त्यावर लावल्याने वाहतूक कोंडी होते. येथे रोजच ग्राहकांची गर्दी होते. त्यामुळे करोनाचा धोका वाढण्याची शक्‍यता आहे. करोनाचा धोका लक्षात घेता काही दिवस हे प्रकार थांबावेत.

– सदाभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष, गंगाधाम सोसायटी.


मार्केटयार्डातील सर्व विभाग सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील भाज्या, फळांची विक्री थांबली पाहिजे. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. सुरक्षा पाळली जात नाही. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढेल. याबाबत महापालिका आयुक्त आणि बाजार समितीला पत्र दिले आहे.

– संतोष नांगरे, सचिव, कामगार युनियन.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.