पुणे – राज्यातील जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पाऊस पडला, तर शहर परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी झाल्या. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाशी स्थिती कायम राहील, असा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या काही तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र काही अंशी ढगाळ वातावरण राहणार आहे. पुण्यातही गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. शहर परिसरात सकाळी अंशत: ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी झाला असला, तरी उकाडा कायम आहे.
हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, दक्षिण छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशाचा परिसर यादरम्यान गेल्या आठवड्यापासून कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकाची किनारपट्टी यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे.
उत्तर कर्नाटक व परिसर आणि कोमोरीन परिसर व मध्य प्रदेशच्या वायव्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने खेचले जाण्याची शक्यता असल्याने विदर्भात तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहील.