झेडपीच्या माध्यमातून 20 कोटी खर्च : रस्त्याची पुनर्बांधणी
वाल्हे : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून, वाल्हे (ता. पुरंदर) गावामधून श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, घोडेउड्डाण मंदिर, हरणी येथील महादेव मंदिर आदी गावाला जोडणारा वाल्हे ते हरणी हा रस्ता मागील पंचवीस वर्षांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत होता. अखेर यावर्षी रस्त्याचे नशीब उघडले असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 20 कोटी खर्च करुन या रस्त्याची पुनर्बांधणी केली जात आहे.
राऊतवाडीफाटा-हरणी-वाल्हे-राख रस्त्याच्या कामाला निकृष्ट दर्जाचे ग्रहण लागले आहे. यामुळे हरणी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गुरूवार (दि.17) ग्रामस्थांनी कामात सुधारणा न झाल्यास उपोषण कऱण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात राख येथे या कामाचे भूमिपूजन केले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी वाल्हे- मांडकी, हरणी रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हे काम दोन टप्प्यांमध्ये दोन ठेकेदारांमार्फत होत आहे.
वाल्हे बाजूने निकृष्ठ दर्जाचे, तर दुसऱ्या राऊतवाडी बाजूने चांगल्या दर्जाचे काम होत आहे. संतप्त ग्रामस्थांनी ठेकेदार पी. टी. कदम यांच्याशी संपर्क साधत चौकशी करण्याचा प्रयत्न केला. संबंधित ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे देत प्रत्यक्ष कामावर येण्याचे टाळल्याचे सरपंच धनंजय यादव यांनी सांगितले. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुभाष चौरे यांच्याशी संपर्क साधला असता ते देखील या कामावर पाहणी करण्यासाठी अद्याप आलेच नाहीत.
ठेकेदार व अधिकारी जोपर्यंत दर्जाबाबत हमी देत नाही. तोपर्यंत हे काम बंद पाडणार आहे. पर्याय न निघाल्यास उपोषणाचा इशारा विजय यादव यांनी दिला आहे. यावेळी सरपंच धनंजय यादव, विजय यादव, अमोल यादव, संतोष यादव, शंकर यादव, शिवाजी यादव, ओंकार यादव, जलिंदर यादव, हरिशचंद्र यादव, नानासाहेब यादव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, उपोषणाच्या इशाऱ्यानंतर बांधकामचे शाखा अभियंता सुभाष चौरे यांनी ठेकेदारासह भेट दिली. यावेळी त्यांनी नियमानुसार काम कऱण्याचे आश्वासन दिल्याचे सरपंच यादव यांनी सांगितले.
हे काम इस्टिमेटप्रमाणे सुरू असून कामास सुरूवात झाली आहे. अजून भरपूर काम बाकी आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पुढील टप्प्यात त्यांचे निराकरण होईल. हा रस्ता चांगल्या दर्जाचा होणार आहे. ग्रामस्थांनी यावर आवर्जून लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या मागणीनुसार हा रस्ता मजबूत होणार आहे.
– सुभाष चौरे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा.