काऱ्हाटी – सुपे (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. 8) भरणारा आठवडे बाजार करोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सुपे येथील ग्राम सचिवालयात सोमवारी (दि. 8) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच ज्योती जाधव, सदस्य मल्हारी खैरे, मुनीर दफेदार, संजय दरेकर, विलास झेंडे, दत्तात्रेय पन्हाळे, गाव कामगार तलाठी दीपक साठे आदींसह व्यापारी उपस्थित होते.
संसर्ग टाळण्यासाठी सुपे व सुप्यापासून विभक्त झालेल्या गावातील व्यापारी व शेतकऱ्यांना शेतीमाल बाजार तळाबाहेर ग्रामपंचायतीने दिलेल्या नियमानुसार विकण्यास मान्यता दिली आहे. मात्र, आठवडे बाजार रद्द केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी डी. जी. लोणकर यांनी दिली. पोलीस आरोग्य सेवक महसूल विभाग ग्रामपंचायत व स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या खबरदारीमुळे आतापर्यंत सुपे परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.