- आयुक्तांच्या आदेशानंतर 236 वाहन चालकांना पोलिसांचा दणका
पिंपरी – बुलेटचा सायलन्सर बदलून मोठा आवाज करणाऱ्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. त्यानंतर आठवडाभरात वाहतूक पोलिसांनी तब्बल 236 वाहन चालकांवर कारवाई केली. यामध्ये 173 बुलेट चालकांचा समावेश आहे.
चौकात तलवारीने केक कापण्याचा प्रकार एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. यावेळी संतप्त झालेल्या आयुक्तांनी वायरलेसवरून पोलिसांना खडे बोल सुनावले. त्याचवेळी शहरात बुलेटचा सायलन्सर बदलून मोठा आवाज करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर 18 ते 25 ऑक्टोबर दरम्यान वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडका लावला. बुलेटचा सायलन्सर बदलल्यास एक हजार रुपयांचा दंड आहे. तर फॅन्सी नंबरप्लेट लावल्यास दोनशे रुपयांचा दंड आहे. आठवडाभरात बुलेटचा सायलन्सर बदलणाऱ्या 173 जणांवर कारवाई करीत एक लाख 73 हजारांचा दंड ठोठावला. त्यापैकी 36 हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वसूलही केला आहे. तर फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या 63 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
त्या पोलिसांवर कारवाई कधी?
बुलेटचा सायलन्सर बदलणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मात्र बहुतांश पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडे बुलेट असून त्यांनीही सायलेन्सर बदलला आहे. मात्र अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार? एवढेच नव्हे तर खासगी वाहनांवर पोलीस लिहिण्यास किंवा पोलिसांचा लोगो वापरण्यास बंदी असतानाही अनेक जणांच्या वाहनांवर पोलीस लिहिलेले आहे. अशा वाहनांवरही वाहतूक पोलीस आपलेच भाऊबंद म्हणून कारवाई करीत नाहीत. यामुळे पोलिसांना वेगळे नियम आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.