लोणंद (प्रतिनिधी) – पाडेगाव (ता. फलटण) येथील प्राथमिक शिक्षक तसेच प्रसिद्ध ग्रामीण लेखक, कवी प्रविण जोशी यांचे ‘माणुसकीचा गाव’ हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरले होते. नीरा येथील अक्षरबंध प्रकाशनमार्फत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. वर्षभरातच या पुस्तकाच्या प्रकाशन संस्थेने ललित साहित्यातील उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने ग्रंथनिर्मिती व दिवाळी अंक निर्मितीसाठी विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावेळी ग्रामीण तसेच निमशहरी भागातून प्रकाशित झालेले ‘माणुसकीचा गाव’ हे पुस्तक उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीसाठी पात्र ठरले. किरण बोधे हे अक्षरबंध प्रकाशनचे प्रकाशक असून प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. व. बा. बोधे हे त्यांचे वडील आहेत. या प्रकाशनसंस्थेमार्फत आजवर अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले असून अनेक ग्रंथ वाचकांच्या पसंतीला उतरले आहेत.
‘माणुसकीचा गाव’ हे माणदेशी व्यक्तिचित्रण असून त्यात संघर्ष, दुष्काळ, व्यक्तिरेखांचे अनेक पैलू आहेत. सत्यपरिस्थितीवर आधारलेले हे पुस्तक आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. दरम्यान, निवडीनंतर साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रकाशक किरण बोधे व लेखक प्रविण जोशी यांचे अभिनंदन केले. पुरस्कार वितरण सोहळा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स टिळक रोड पुणे येथे होणार आहे.