शिरूर -शिरूर नगर परिषद व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणे पाण्याचा प्रवाह सुरू आहे. बंधाराच्या मातीचा भराव फोडून पाणी वाहत आहे. घोड नदीवरील या बंधाऱ्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डिंभे व कुकडी धरणातून जवळपास 35 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी दिवसभरात वाढली आहे. त्यामुळे घोडनदीला पूर आला आहे. या पुरामुळे शिरूर नगरपरिषदेला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बाजूकडील मातीचा भराव तोडून पाणी 30 ते 35 मीटर लांबून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे.
पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेचे पूर पथक सतर्क झाले आहे. नदी काठावरील रहिवाशांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नगरपरिषदेस संपर्क करावे, असे आवाहन सभागृहनेते प्रकाशभाऊ धारीवाल व मुख्य अधिकारी रोकडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.