वॉशिंग्टन – गेल्या काही कालावधीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे यंत्रमानवाच्या साह्याने विविध कामे करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याने त्याचे आता दुष्परिणामही समोर दिसू लागले आहेत. या नव्या तंत्रज्ञानामुळे आपली नोकरी जाण्याची भीती असल्याने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
अमेरिकेत विविध मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टर यांच्याकडे मानसिक आजारासाठी उपचार करून घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मानसिक उपचार तज्ञांनी या आधुनिक आजाराला ‘एआय अँगझायटी’ असे नाव दिले आहे सर्वच प्रकारच्या व्यवसायामध्ये आणि उद्योगांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागल्याने आगामी दहा वर्षांच्या कालावधीमध्ये मानवी रोजगाराची जागा यंत्रमानव घेतील अशी भीती वाटू लागली आहे.
बँका आणि विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे. एवढेच नाही, तर चित्रपट व्यवसायामध्ये सुद्धा पटकथा आणि लेखनासाठी या तंत्रज्ञानाचा वापर आता केला जाऊ लागल्याने लेखकही चिंतेत पडले आहेत. मार्च महिन्यात प्रकाशित करण्यात आलेले एका अहवालानुसार, येत्या काही कालावधीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तब्बल 30 कोटी लोक बेरोजगार होऊ शकता.