Nestlé Share Price- नेस्ले इंडिया या कंपनीच्या शेअरचा भाव गुरुवारी तीन टक्क्याने कोसळला. यामुळे एकाच दिवसात या कंपनीचे बाजार मूल्य 8,137 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
ही कंपनी जगभरातील विविध देशात बालकासाठी दूध आणि इतर खाद्यपदार्थ पूरविते. मात्र या कंपनीने विकसनशील देशातील बालकांच्या खाद्यात गेल्या अनेक वर्षापासून साखरेचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त केला असल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला आहे.
त्यानंतर आज या कंपनीच्या शेअरच्या भावात मोठी घट झाली असल्याचे दिसून येते. आज या कंपनीच्या शेअरचा भाव 2,462 रुपये प्रति शेअर या पातळीपर्यंत कमी झाला होता. तसेच कंपनीचे बाजारमूल्य एकाच दिवसात 8,137 कोटी रुपयांनी कमी होऊन 2.3 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.
विकसित देशापेक्षा गरीब देशातील बालकांच्या खाद्यामध्ये ही कंपनी जास्त साखर वापरत असल्याचा आरोप केल्यानंतर नेस्ले इंडिया या कंपनीने गुरुवारी सांगितले की, भारतामध्ये या कंपनीने गेल्या पाच वर्षात बालकांच्या खाद्यातील साखरेचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी केले आहे.
त्या अगोदर स्वित्झर्लंड मधील एका एनजीओने असा आरोप केला की, भारत, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील गरीब देशातील बालकांच्या खाद्यात नेस्ले कंपनी जास्त साखरेचा वापर करते. मात्र विकसित देशातील बालकांच्या खाद्यात साखरेचा वापर कमी केला जातो. यानंतर नेस्ले कंपनीवर टीका केली जाऊ लागले आहे.
यानंतर या कंपनीच्या प्रवक्तयाने स्पष्ट केले की आम्ही असा भेदभाव करत नाही. भारतातील खाद्यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेतला जातो. साखर कमी करून इतर अन्न घटकाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो.