सावलीनेही पाठ सोडली

नागरिकांनी अनुभवला "शून्य' दिवस

पुणे – शहरात गुरुवारी दुपारी शून्य सावली दिवस अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळाली. याप्रसंगी खगोलशास्त्रीय स्थितीमुळे व्यक्‍ती अथवा वस्तूची सावली नाहीशी झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक खगोलप्रेमींनी उत्सुकतेने याबाबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

 

करोनाकाळात अनेक महत्त्वपूर्ण दिवस, घटना साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, नागरिक यातही काही उपाय शोधत साधेपणाने का होईना त्या दिवसाचा आनंद साजरा करतात. असाच एक दिवस एका अनोखी खगोलशास्त्रीय घटना गुरुवारी पुणेकरांनी अनुभवली. ती म्हणजे शुन्य सावली दिवस.

 

खगोलशास्त्रानुसार, सूर्याच्या उत्तरायण किंवा दक्षिणायनादरम्यान ज्या अक्षांशाच्या आकाशातून त्याचा प्रवास होतो, त्या अक्षांशावरील शहरांमध्ये दुपारी साडेबाराच्या दरम्यान सूर्याची किरणे थेट लंबरूप पडल्यामुळे काहीकाळ सावली नाहीशी होण्याची घटना अनुभवायला मिळते.

 

सूर्याने 22 मार्च रोजी विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धाच्या आकाशात प्रवेश केला आहे आणि या उत्तरायणादरम्यान 6 ते 26 मे या कालावधीत सूर्याचा महाराष्ट्राच्या आकाशावरून प्रवास होत आहे. याकाळात ज्या शहराच्या अक्षांशावरून सूर्याचा प्रवास होईल, त्या शहरांमध्ये दुपारी साडेबारादरम्यान काहीकाळ सावली नाहीशी होण्याची घटना पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये शून्य सावलीची घटना सूर्याच्या उत्तरायणादरम्यान 13 मे रोजी दुपारी 12:31 वाजता पाहायला मिळाली.

या वेळेत एखाद्या वस्तू अथवा व्यक्‍तीची सावली ही पूर्णपणे नाहीशी झाल्याचे नागरिकांनी अनुभवले. सूर्याच्या उत्तरायनाला मार्च महिन्यात सुरुवात झाली असून, 21 जून रोजी तो सर्वोच्च बिंदूवर म्हणजेच 23.5 उत्तर अक्षांशांवर पोहचेल, अशी माहिती खगोलशास्त्र अभ्यासकांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.