बारामती – विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडला. बॉम्बमधील एक प्रकरण बारामतीशी संबंधित असून बारामतीतील निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या कथित संपत्तीचा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित करून मोठी खळबळ उडवून दिली आहे.
पोलीस सेवा दलातील निवृत्त सहायक आयुक्त ईसाक बागवान हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांच्या बंधूंच्याच बाबतीत स्टिंग ऑपरेशन झाल्याने एक नवीन माहिती पुढे आली आहे. बारामतीतील बागवान यांच्या 42 एकर जमिनी, मुंबई आणि पुण्यातील संपत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अधिवेशनात फडणवीस यांनी दुसऱ्या पेन ड्राईव्ह संदर्भातील बागवान यांच्या संदर्भातील एक प्रकरण उपस्थित केले. बारामतीसह पुणे जिल्ह्यात, पोलीस दलातही खळबळ उडाली.
फडणवीस यांनी बागवान यांच्या बारामतीतील संपत्तीवर आरोप केले नाहीत. मात्र, प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामध्ये फडणवीस म्हणाले, गट क्रमांक 69 मधील 16 हेक्टर 48 आर म्हणजे 42 एकर बिगरशेती जमीन बागवान यांची आहे. बारामतीमध्ये आता एनए जमीनीचे दर काय आहेत. अजितदादा तुम्हालाही याची कल्पना असेल, असे म्हणत फडणवीस यांनी हा बॉम्ब फोडला.
बारामतीतील अशोकनगरसह इतर ठिकाणीही व मुंबईपर्यंत त्यांच्या जमिनी व जागा असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला. भाऊ नसीर बागवान, भावजय बिलकिस बागवान यांच्या नावावर जमिनी खरेदी केल्या. बागवान नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी फक्त एक साधा अर्ज देऊन या सर्व जमिनी व संपत्ती आपल्या नावावर केल्या आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
फरीद मोहम्मद अली याने 41 लाख रुपयाला मुंबईतील संपत्ती विकत घेतली. ती जमीन दहा वर्ष नावावर ठेवल्यानंतर 30 डिसेंबर 2020 रोजी फरीद मोहम्मद अली वेल्डर याच्या मुलाने ही सगळी संपत्ती बागवान यांना बक्षीसपत्र करून दिली. यात एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. यात नसीर बागवान यांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. यामध्ये संबंधित नेता बारामतीला गेल्याची माहिती असून हे मुंबईचा मोठा नेता आहे.
दरम्यान, हाजी मस्तानच्या भावाचा उल्लेख करीत फडणवीस यांनी या प्रकरणात इसाक यांनी त्याला सोडल्यानंतर इसाक यांना मुंबईत सेंट्रल परिसरात एक फ्लॅट मिळाला होता, असाही आरोप करून खळबळ उडवली. मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून कशा
पद्धतीने जमिनी घेतल्या गेल्या असा आरोप करत फडणवीस यांनी हे प्रकरण नवाब मलिक यांच्यापर्यंत पोहोचवले. दरम्यान, या संदर्भात अद्याप कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आले नसून सरकार यात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, फडणवीस यांनी दोन्ही पेन ड्राईव्ह सादर करताना अप्रत्यक्षपणे बारामतीला लक्ष्य केले आहे.
फरीद मोहम्मद अली वेल्डर कोण?
फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमध्ये या जमिनीपेक्षाही फरीद मोहम्मद अली वेल्डर या व्यक्ती संदर्भात घेतलेले आक्षेप चर्चेचे ठरले. यासंदर्भात फडणवीस यांनी अशी माहिती दिली. 2017 मध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला ठाणे क्राईम ब्रांचने अटक केली होती. त्यावेळी इकबाल कासकर याने सांगितले होते की, वेल्डर याला आपण पैसे दिल्याचे कासकर याने सांगितले होते. त्यावेळी त्या वेल्डरवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, फरीदची चौकशी झाल्यानंतर सात दिवसांत तो मृत्युमुखी पडला.