बेबेड ओहोळ येथील साकव पूल बनला धोकादायक

वाहनचालक, नागरिक हैराण ; नवीन पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत

सोमाटणे – बेबड ओहोळ येथील साकव पूल अत्यंत धोकादायक बनला असून, पूल जीर्ण झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

राज्य शासनाने शेतीच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने सन 1975 साली येथे साकव पूल बांधण्यात आला होता. पूर्वी बैलगाडी व लहान वाहने यासाठी असलेल्या या पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक केली जाते. दरम्यानच्या काळात परिसरात कंपन्या स्थापन झाल्या. त्यामुळे या रस्त्यावर सतत मोठ्या वाहनांची रहदारी वाढत गेली. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे दहा वर्षांपूर्वीच साकव पूल कमकुवत होवून एक मोरी सुद्धा वाहून गेली होती. तसेच या पुलावर मोठमोठे खड्डे देखील पडले आहेत. पुलाचे संरक्षण कठडे गायब झाले असल्याने पादचारी नागरिकांना मोठा धोका पत्करावा लागत आहे.

या साकव पुलावर पाटबंधारे विभागाकडून वेळोवेळी डागडुजी करण्यात आली; परंतु सद्यस्थितीत हा साकव पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. या साकव पुलाची अवजड वाहनांची क्षमता नसताना व पुलाची कालबाह्य मर्यादा संपलेली आहे. तरीदेखील पुलावरून मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक केली सुरू आहे. त्यामुळे मोठी जीवित हानीची शक्‍यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकारामुळे पवन मावळातील जवळपास वीसहून अधिक गावांसह वाड्या वस्त्याच्या दळणवळणासाठी व बेबड ओहोळ परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हा साकव पुलाची मर्यादा संपल्याने नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. सहा वर्षांपासून नवीन पुलाचे काम चालू असून, जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असले तरी अत्यंत संथ गतीने होत असलेल्या हा पूल वाहतुकीसाठी कधी सुरू होईल, याची शास्वती कोणालाही देता येत नाही. त्यामुळे आणखी किती दिवस नवीन पुलाच्या उद्‌घाटनाची वाट येथील नागरिकांना पहावी लागणार, असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.