आंबेठाण -गुरुवारी (दि. 14) झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने महाळुंगे इंगळे परिसराला झोडपून काढले. यामध्ये काही घरांचे छत उडून गेले.
संध्याकाळी साडेसहा वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. हिरामण रामभाऊ महाळुंगकर यांच्या राहत्या घराचे छत उडून दोनशे फूट अंतरावर जाऊन पडले आहे. ही घटना घडली तेव्हा संपूर्ण कुटुंब घरामध्ये होते सुदैवाने कुठलीही ही जीवित हानी झाली नाही; परंतु घराचे व घरातील वस्तूंचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुभाष चंद्रकांत भोसले यांच्या दहा खोल्यांचे पत्रे उडाले आहेत. देविदास गुलाब वाळके यांच्या पोल्ट्री शेडचे नुकसान झाले. सुरेश आनंदराव शिवळे, राम काळूराम भोसले, शिवाजी धोंडीबा महाळुंगकर, संजय रामचंद्र गायकवाड यांच्या पत्राशेडचे नुकसान झाले आहे. तलाठी श्याम वालेकर पोलीस पाटील सचिन भोपे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
आधीच करोनाने आर्थिक परिस्थिती हलाखीची त्यात पावसाने वादळी वाऱ्याने डोक्यावरील छत्रसुद्धा हिरावून घेतल्याचे दुःख नुकसानग्रस्त नागरिक करत आहेत. प्रशासनाने अशा परिस्थितीत आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त नागरिक करीत आहेत. तसेच परिसरातील अनेक विद्युत तारेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे.