मूर्तीकार संभ्रमात : ‘श्रीं’च्या मूर्तींसाठी अद्याप ऑर्डर नाही
पिंपरी -लाडक्या गणरायाचे आगमन यंदा लवकरच म्हणजे 22 ऑगस्ट रोजी होत आहे. मात्र करोनामुळे गणेशोत्सवाशी निगडीत असलेल्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. करोनाच्या संकटामुळे या व्यवसायांवरही मंदीचे सावट पसरले आहे. गणेशोत्सवाला अवघ्या तीन महिन्याचा कालावधी उरला असला तरी अजूनही गणेशमूर्ती बनविण्यासाठी ऑर्डर देण्यासाठी मंडळे पुढे आलेली नाहीत.
“लॉकडाऊन’मध्ये शिथिलता आणली असली तरी शहरी भागामध्ये अद्याप काटेकोरपणा पाळला जात आहे. यामुळेच गणेश मूर्ती घडविण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करण्यात अडचणी येत आहे. साधारणपणे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात केली जाते. यंदा करोनाचा विषाणू सर्वत्र पसरला असल्याने सारेच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात लॉकडाउनच्या संकटामुळे कच्चा माल उपलब्ध होत नाही. परिणामी मूर्तीकारांना मोठ्या संकटास सामोरे जावे लागत आहे. लॉकडाउन असल्यामुळे मंडळांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मूर्ती व्यावसायिक संभ्रमात आहेत.
गणेशमूर्ती शाडू माती तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जातात. यासाठीचे काही साहित्य परराज्यातून उपलब्ध होते. मात्र मागणीप्रमाणे कच्चा माल उपलब्ध होऊ शकत नसल्याने मूर्ती तयार कशा कराव्यात असा प्रश्न मूर्तीकारांना पडला आहे. काही मूर्तीकारांनी उपलब्ध साहित्यावर मूर्ती बनविण्यास सुरुवात केली असली तरी सजावटी रंगरंगोटीसाठी मिळणारा कमी कालावधी चिंतेत भर घालत आहे.
कच्चा मालाच्या वाढलेल्या किंमती, मजुरी, वाहतुकीच्या खर्चात झालेली वाढ याचा परिणाम मूर्तीच्या किमतीवर निश्चितच होणार आहे. या व्यवसायावर कुटुंबांची उपजीविका चालत असल्याने मूर्तीकार हतबल झाले आहेत. आपल्यावर आलेल्या संकटाला नागरिक नेहमीच गणरायाला साकडे घालत असतात. गणेशोत्सवाची चाहूल लागली असतानाच सारे करोनामुळे चिंतेत आहेत. त्यामुळे “हे गणराया करोनाचे संकट घालव रे’ अशा आर्त विनवणी सारेजण गणरायाला घालत आहेत.
मंडळाचे कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत
करोनाच्या संकाटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सुद्धा मूर्तीची उंची, मिरवणुका, सजावट, देखावे याबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे अगोदर ऑर्डर नोंदविण्यासाठी उत्साह दिसत नाही. उत्सवाच्या स्वरुपाबाबतच गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसत आहे.
मूर्तीसाठी लागणारे साहित्य मिळविताना मोठी कसरत करावी लागत आहे. साहित्य उपलब्ध होत नसल्याने अद्याप काम सुरु होऊ शकले नाही. तसेच दरवर्षी मार्च महिन्यातच मोठ्या मंडळाच्या गणेश मूर्तींची ऑर्डर दिली जाते. मात्र यंदा लॉकडाउन असल्यामुळे मंडळेही द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे अद्याप एकाही मंडळाची ऑर्डर आली नाही.
– मयूर जगताप, मूर्तीकार.