तळेगाव ढमढेरे -तळेगाव ढमढेरेसह परिसरात शनिवारी (दि. 16) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तोडकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या छतावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे शाळेचे नुकसान झाले आहे. शासन स्तरावरून निधरी उपलब्ध करून शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर भुजबळ यांनी केली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील तोडकरवाडी शाळेचे छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने वर्गातील संगणक, प्रोजेक्टर, ई-लर्निंग संच तसेच काही शालेय रजिस्टर पावसात भिजून गेले आहे.
दरम्यान, या शाळेत 39 विद्यार्थी शिक्षण घेत असून 2 शिक्षक कार्यरत आहेत. नव्याने समाज सहभागातून तोडकरवाडी शाळेने आपले रूप पालटले होते. त्यातच अशी घटना घडली यामुळे येथील ग्रामस्थ चुटका लागून गेला असल्याचे सांगितले. तर सध्या शाळा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन उठल्यानंतर शाळा सुरू होईल, तेव्हा विद्यार्थ्यांच्या बसण्याची गैरसोय होणार आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी शासनस्तरावरून लवकरात लवकर निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी सुधीर भुजबळ, उपाध्यक्ष विशाल तोडकर, ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला आण्णासो तोडकर आणि काकासाहेब तोडकर यांनी केली आहे.