बिबट्याची जबाबदारी फक्‍त वनविभागाची नाही

डॉ. अजय देशमुख यांचे वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त मार्गदर्शन

– संजोक काळदंते

ओतूर – बिबट्या दिसला की लगेच बोभाटा होतो. दुसऱ्या दिवशी तो हल्लेखोर ठरतो. गावात बिबट्याची दहशत – बिबट्याच्या भीती… अशा शब्दांत बातम्या पसरतात. समाज माध्यमे अशा गोष्टींना अधिक खत-पाणी घालतात. या गोष्टींचेही मग राजकारण होते. आपल्या सोयीनुसार त्याचा संबंध जोडून मानव-बिबट संघर्षाचा उपयोग करण्यात येतो. वनविभागाला निशाणावर धरले जाते. तुमचा बिबट्या घेऊन जा किंवा तुमच्या बिबट्याला पकडा, अशा प्रकारची मागणी वनखात्याकडे केली जाते. मग प्रश्‍न येतो तो, बिबट्या फक्त वनविभागाचाच आहे का? याच्या निवारणासाठी नागरिकांची किंवा स्थानिक ग्रामस्थांची जबाबदारी काहीच नाही का?

बिबट-वावर क्षेत्रात काम करताना वन कर्मचाऱ्यांना या बाबी अगदी जवळून दिसतात. मूळ उद्देश बाजूला ठेवून प्रत्येक जण फक्त त्याचे भांडवल कसे होईल याकडे पाहतो. बिबट्यांचे सातत्याने नागरी वस्तीवर होणारे हल्ले ही समस्या आणि त्याचे निवारण ही केवळ वनखात्याचीच जबाबदारी आहे असे नाही, तर त्यासाठी सर्व स्तरांतील लोक, सामाजिक संस्था आणि इतर संबंधित सरकारी विभागांचा सहभागही यासाठी महत्त्वाचा आहे. सर्वांनी एकत्र येऊनच त्यासाठी काम करणे गरजेचे आहे.

बिबट्यांचे हल्ले निवारणासाठी उपाययोजना
जुन्नर तालुक्‍यातील ऊस क्षेत्रात साधारणपणे बिबट्यांचा वावर अधिक दिसून येतो. या ठिकाणी “थ्री फेज’ वीज उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते फायद्याचे होणार आहे. कृषी विभागातर्फे बंदिस्त गोठापद्धतीसाठी बिबट वावर क्षेत्रात अनुदान दिले तर त्या पद्धतीने गोठे बांधण्यात येतील आणि बिबट्यांचा वावर आपोआपच कमी होईल. या क्षेत्रात पथदिव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेमार्फत ती पूर्ण होणे आवश्‍यक आहे. याबरोबरच कचऱ्याचे नियोजनही व्यवस्थित होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे डुकरे, कुत्री अशा भटक्‍या जनावरांचा वावर कमी होईल. परिणामी बिबट्याचे क्षेत्रही कमी होईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गावात स्वच्छतागृहाचा वापर बंधनकारक होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री शेतात जाणे कमी होऊन मानवावरील बिबट्यांचे हल्ले कमी होतील. ग्रामस्थांनी बिबट वावर क्षेत्रात वावरतांना नेहमी हातात काठी, टॉर्च ठेवावा. रेडिओ किंवा मोबाइलवर गाणी वाजवत जावे. शेतीचे कामे बसून किंवा वाकून करताना नेहमी कोणीतरी सोबत ठेवावे.

मानव-बिबट्याचा संघर्ष जुनाच
जंगल व मानववस्ती या दोन्हीच्या सीमारेषेवर राहणारा बिबट्या हा प्राणी आहे. त्यामुळेच मानव-बिबट संघर्ष पूर्वीपासूनचा आहे.

बिबट्यासाठी पिंजरा लावायचा, त्यात तो अडकला की दूर कुठेतरी नेऊन त्याला सोडायचे, असे केल्याने बिबट्यांचा प्रश्‍न सुटणार आहे का? असे केल्याने जो प्रश्‍न इथे निर्माण झाला आहे, तो दुसरीकडे निर्माण होईल. ज्या परिसराबद्दल त्या प्राण्याला माहिती नाही, अशा ठिकाणी सोडल्यास तो अधिक आक्रमक होत असतो आणि त्यांचे हल्ले अधिक वाढण्याचा संभव असतो. याबरोबरच आज एक बिबट्या पकडला, तर त्याची जागा दुसरा बिबट्या घेणार नाही, हे नक्की सांगता येत नाही. त्यामुळे बिबट्यांसाठी पिंजरे हा एकमेव पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला बिबट सोबत राहवेच लागेल हे कट्टू सत्य आहे. काही सुरक्षतात बाळगून आपल्याला सहजीवन घडवून आणावे लागणार आहे.
– डॉ. अजय देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी, माणिकडोह बिबट बचाव केंद्र, जुन्नर

Leave A Reply

Your email address will not be published.