सातारा – येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारे 8 करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना गुरूवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. रुग्णालय प्रशासनाने टाळ्यांच्या गजरात या रुग्णांना निरोप दिला.
हे 8 रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये तरडगाव (ता. फलटण) येथील 67 वर्षीय महिला व 6 वर्षाचा मुलगा, फलटण येथील 33 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 13 वर्षांची मुलगी, कोडोली (ता. सातारा) येथील 18 वर्षाचा युवक, महाबळेश्वर येथील 23 वर्षीय युवक, त्रिपुटी (ता. कोरेगाव) येथील 36 वर्षीय पुरुष व खटाव तालुक्यातील खरशिंगे गावचा 18 वर्षीय युवक अशा आठजणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 106 रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयातील 4 ( चिंचनेर निंब ता. सातारा येथील मुंबईवरून आलेला 30 वर्षीय युवक, गादेवाडी ता. खटाव येथील 30 व 32 वर्षीय पुरुष तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाच्या निकट सहवासातील 9 वर्षाची मुलगी), कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 3 ( म्हासोली येथील 22 वर्षीय युवती व 28 वर्षीय पुरुष तसेच मेरुएवाडी येथील 33 वर्षीय पुरुष), फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 2 (कोळकी येथील 74 वर्षीय पुरुष व फरडवाडी, ता. माण येथील 50 वर्षीय पुरुष), वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील कवठे ता. खंडाळा येथील 33 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल म्हासोली येथील 50 वर्षीय निकट सहवासित अशा एकूण 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यापैकी फलटण येथील 74 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता.
त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 181 जण करोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 79 जण उपचार घेत आहेत. 106 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. करोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 34, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 55, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 11, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 7 व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 12 अशा एकूण 119 जणांचा तसेच कराडच्या कृष्णा मेडिकलमधील 10 जणांचा अशा एकूण 129 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दि.20 रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 13, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 57 अशा एकूण 70 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन. सी. सी. एस. यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 19 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.