मल्हारपेठ (वार्ताहर) – दिवशी बुद्रुक ता. पाटण येथे करोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, रुग्णाच्या संपर्कातील आणखी एक महिला करोनाबधित सापडली आहे. त्यांच्या संपर्कातील 26 जणांची आणि परिसरातील इतर तीन गावातील 3 जणांची अशी एकूण 29 जणांची तपासणी अँटीजन किटद्वारे करण्यात आली. या तपासणीत सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मरळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या दिवशी बुद्रुक उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायतीने घेतलेल्या काळजीमुळे गावात करोनाचा शिरकाव थोपविण्यात चांगले यश आले होते. मात्र, परगावाहून आलेल्या व्यक्तींमुळे करोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. गावातील एका ज्येष्ठ नागरिकांना करोनाची बाधा झाल्याने पुन्हा गावाची झोप उडाली.
त्यात त्यांची बहिणही बाधित आल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात आलेल्या 26 जणांची आणि टेळेवाडी, मारुलहवेली व सूर्यवंशीवाडी येथील प्रत्येकी एक आशा 29 जणांची अँटीजेन किटद्वारे तपासणी करण्यात आली. त्यात सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने गावाने सुटकेचा नि:श्वास टाकला. डॉ. इंदिरा भिंगारदेवे, सी. ए. पाटील, एस. डी. मगरे, टी.डी. जाधव, निलेश सूर्यवंशी, एम. ए. कांबळे, एन. टी. नलवडे, एस. एस. सूर्यवंशी उपस्थित होते.