पुणे – “तुमचे येर वित्त धन । ते मज मृत्तिकेसमान ।।’ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या या अभंगांच्या ओवीची तंतोतंत प्रचिती तीर्थक्षेत्र आळंदीत आली. आळंदीत वैष्णवांची मांदियाळी भरली आहे. अशावेळी हौसे, नवसे यांची गर्दीही यात असतेच. मात्र, त्यातही प्रामाणिकपणाचा एक आगळा अनुभव वारकऱ्यांना गंध लावणाऱ्या मुलीकडून आला. ही मुलगी आळंदीत वारकऱ्यांना गंध लावते आणि पै पै जमा करते. याचदरम्यान तिला हजारो रुपयांचे एक सोन्याचे मंगळसूत्र सापडले मात्र, तिने ते त्वरीत आळंदी पोलीस ठाण्यात जमा केले. तिच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अलंकापुरी ही भाविक भक्तांनी नेहमीच गजबजलेली असते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. आता तर आषाढी वारीचे दिवस आहेत. माउलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. दर्शनबारीत तासन्तास उभे राहून भाविक माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेत आहेत. गर्दीच्या ठिकाणी सोने व पैसे चोरी होण्याची शक्यता असते; त्यामुळे महिला वारकरी या सोन्याचे दागिने एका पाकिटात ठेऊन ते कमरेला ठेवतात.
दरम्यान, दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेचे पाकीट खाली पडले होते. दर्शनबारीतील भाविकांना गंध लावणाऱ्या चिमुकल्या पूजा भामरे या छोट्या मुलीला ते सापडले. पाकीट सापडल्यानंतर मनात कुठलाही लोभ न ठेवता पूजाने थेट पोलीस ठाणे गाठून मिळालेला ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलीस उपायुक्त मंचर इप्पर, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी या चिमुकलीचे कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली.
पूजाची आई अर्चना आणि वडील भय्यासाहेब भामरे हे मूळचे चाळीसगाव येथील आहेत. आळंदीत एका भाड्याच्या खोलीत ते राहतात. यात्राकाळात इंद्रायणी घाटावर फुल-दिवे ते विकतात. इतरवेळी बिगारी काम करतात. पूजा ही भाविकांना गंध लावते. यातून तिला दिवसाकाठी 50 ते 200 रुपये मिळतात. मिळालेले पैसे ती बॅंकेत जमा करून शिक्षणासाठी खर्च करते. सध्या ती तिसरीच्या वर्गात शिकते. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न आहे.
पै पै करून जमा करून ठेवले बॅंकेत
दर्शनबारीतील भाविकांना गंध लावत होते, तेव्हा मला एक पांढऱ्या रंगाचे पाकीट सापडले. ते मी चौकीत जाऊन पोलिसांना दिले. माझ्यासोबत माझे मित्र अथर्व आणि स्वरा होते. कशाला कुणाचे सोने-पैसे आपल्याला ठेवायचे? ते पाप आहे. आपल्याला कुठे ना कुठे फेडावे लागणारच… म्हणून मी ते पोलिसांना दिले.
– पूजा भामरे, आळंदी