ज्ञानेश्वर फड/ प्रीतम पुरोहित
पंढरपूर – आषाढी वारी काळात स्वच्छता हीदेखील विठ्ठल सेवाच आहे. आपण चंद्रभागेत स्नान करतो, त्यावेळी तेथील कचरा, अस्वच्छता बाजूला करून ते पाणी अंगावर घ्यायचो, तेव्हाच किळस आली. अशी भक्ती कामाची नाही. माझा वारकरी असल्या अस्वच्छ पाण्याने स्नान कसा करत असेल? असा प्रश्न मनात आला. आज नदी, चंद्रभागचे वाळवंट, तेथील परिसर स्वतः स्वच्छ करत आहे. ही एक प्रकारची देश आणि विठ्ठलाची सेवाच आहे. यासाठी मी घराचा त्याग करून माझे देशाप्रतीचे कर्तव्य बजावत आहे, अशा भावना मोरगाव येथील ज्येष्ठ वारकरी पिरोजी नेवसे यांनी व्यक्त केल्या.
पिरोजी नेवसे यांना सगळे लोक प्रेमाने अण्णा म्हणतात. वायरमन म्हणून ते मोरगाव येथून आळंदीत आले. बरीच वर्षे राहिले. तेथेच विठुनामाची गोडी लागली. पुढे आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री अशी पंढरपूरची वारी करू लागले. यातच त्यांना ग्राम स्वच्छतेचे महत्त्व समजले. आजही त्यांचे स्वच्छतेचे कार्य अविरत सुरू आहे. आज सत्तरीत गाठलेले अण्णा जेव्हा कामाच्या सुरुवातील सगळ्यांना एकत्र करून सावधान…विश्राम…ची ऑर्डर देतात, त्यानंतर राष्ट्रगीत म्हणतात तेव्हा यांचा हुरूप पाहण्यासारखा असतो.
अण्णांनी आपल्या लोकांना एक संदेश दिला आहे.. तो म्हणजे “दुसऱ्याला मदत करा. जो कोणी उघडा पडला तर झाका, त्याला कपडे द्या. प्रामाणिक सेवा करा. तुम्ही एवढे जरी केले तरी तुमची यात्रा सफल झाली, असे समजा…’ अण्णांनी या सेवाकार्यात अनेक लोक जोडले. कोणी पैसे दिले, तर ते मोठ्या मनाने “नाही’ म्हणून सांगतात. 25 वर्षांहून जास्त कालावधीत विश्व सामाजिक संस्थेत राज्यभरातील सेवक अण्णा यांच्यासमवेत विनामूल्य सेवा करत आहेत.
पडेल ते काम जमेल ती सेवा
वारी काळात अखंडपणे सेवा सुरू असते. सध्या राज्यभरातून 350 पेक्षा अधिक लोक अण्णांसोबत काम करत आहेत. त्यात महिलांचाही सहभाग आहे. पंढरपूर देवस्थानापासून ते दिंडीची सेवा, वाळवंट, पोलीस मदत, पोलीस मित्र अशी दिवस-रात्र ही सेवा सुरू असते. सोबतच ग्राम स्वच्छता, नदी स्वच्छता सर्व काही करतात.