अलिबाग – राज्यात लॉकडाउनच्या काळात रेशनवरील धान्याचा काळाबाजार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अलिबाग तालुक्यातील दिघोडी येथील रास्तभाव दुकान परवानाधारक महेंद्र ठाकूर व त्यांचा नोकर महेश ठाकूर यांच्या विरोधात धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिघोडी येथे रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी या दुकानात बनावट ग्राहक पाठविला. शासनाने 3 रुपये किलो दराने विक्रीसाठी दिलेला तांदूळ चक्क प्रतिकिलो 20 रुपये अधिक घेऊन विकताना या दुकानातील नोकराला रंगेहात पकडण्यात आले.
बनावट ग्राहक असलेल्या या व्यक्तीकडे पोलिसांनी पैसे दिले त्या पैशात कोणतेही रेशन कार्ड नसतानाही त्या व्यक्तीने या दुकानातून जादा पैसे मोजून 50 किलो तांदूळ विकत घेतला. त्याचवेळी पोलीस आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानात छापा मारला.
सध्या लॉकडाउन असल्याने नागरिकांना पुरेसे धान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रांरीवरून आता पोलीस आणि पुरवठा विभागाने छापासत्र सुरू केले आहे. दिघोडी येथील या कारवाईनंतर रेशनिंगवरील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. आता या दुकानाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एम. एस. बोडके यांनी दिली आहे.