भुलेश्वर – सध्या संपूर्ण जग लॉकडाऊनच्या कोषात पुरते अडकून पडले आहे. संपूर्ण मानव वस्ती सामसूम झाली आहे. सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली आहे. या कालावधीत मानवी वस्तीत कधीही न दिसणारे गव्हाणी घुबड आता गेल्या दीड महिन्यापासून माळशिरस येथील एका जुन्या वाड्याच्या तुळईवर बसलेले दिसून येत आहे. मनुष्याला सांगता सांगता नाकीनऊ येत असताना हा मूकप्राणी स्वत:ला क्वारंटाईन करून घेत समाजाला एक संदेश दिला आहे.
गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हा जगातील सर्व भागात आढळतो. निर्मनुष्य ठिकाणी राहणारा हा पक्षी आहे. वाळवंटी प्रदेश, ध्रुवीय प्रदेश व आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत.
याला मराठी मध्ये घो घो पिंजरा, पांजरा, छोटे घुबड, कानेल, चहारा अशी विविध नावे आहेत. निसर्ग मित्र निजाम शेख म्हणाले की, लॉकडाउन सुरू झाल्यापासून हे गव्हाणी घुबड रोज दिवसभर एकाच ठिकाणी बसलेले दिसत आहे. या घुबडाप्रमाणे जनतेने सुद्धा लॉकडाऊनचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे.