चंदीगड – भाजपचे प्रवक्ता तेजींदर बग्गा यांनी प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणात पंजाबचे पोलिस त्यांना दिल्लीत अटक करायला गेले असता केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांमार्फत पंजाब पोलिसांच्या या कामात अडथळा आणल्याने आता पंजाब सरकारनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या सरकारने पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात दोन अर्ज केले असून त्यात त्यांनी केंद्र सरकारलाही प्रतिवादी करण्याची मागणी केली आहे.
पंजाब सरकारने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, आमच्या राज्याच्या पोलिसांना ते जेव्हा बग्गा यांना अटक करण्यासाठी गेले असता त्यांना जनकपुरी आणि कुरूक्षेत्र येथील पोलिस ठाण्यांमध्ये डिटेन करण्यात आले. केंद्र सरकार बरोबरच दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनाही या प्रकरणात प्रतिवादी करण्याची मागणी पंजाब सरकारने केली आहे.
या दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज संरक्षित ठेवण्याचा आदेश द्यावा अशी मागणीही पंजाब सरकारने दुसऱ्या याचिकेत केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 10 मे रोजी होणार आहे. आज कोर्टात झालेल्या सुनावणीच्यावेळी दिल्ली पोलिसांच्यावतीने ऍडिशनल सॉलिसीटर जनरल जैन आणि पंजाब सरकारच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाल्याचे पहायला मिळाले.
बग्गा यांना प्रक्षोभक भाषण प्रकरणात पंजाब पोलिसांनी पाच वेळा नोटीसा पाठवल्या होत्या. पण त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांना अटक करण्याचा पंजाब पोलिसांना पुर्ण अधिकार असल्याचा दावा पंजाब सरकारच्यावतीने कोर्टात करण्यात आला आहे.