काबूल- महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना पूर्ण बुरखा घालावा, असा नवीन फतवा अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने महिलांसाठी जारी केला आहे. तालिबान प्रमुख हैबतुल्ला अखुंदजादा याने हा हुकूम जारी केला आणि नंतर काबूलमधील एका कार्यक्रमात तालिबान अधिकाऱ्यांनी हा नियम जनतेसाठी जारी केला. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर झाकणाऱ्या “चदोरी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या बुरख्याचा वापर महिलांनी करावा. हा बुरखा पारंपारिक आणि आदरयुक्त आहे, असेही आखुंदजादा याने म्हटले आहे.
महिलांसाठी हा नियम जरी नवीन असला तरी तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून महिलांसाठी अशा बुरख्याची सक्ती करण्याचा आग्रह तालीबानकडून धरला जात होता. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण बुरखा वापरावा अशी सूचना करणारी पोस्टर तालिबान्यांकडून राजधानी काबूलमध्ये लावली गेली होता.
1990 च्या दशकात तालिबानच्या राजवटीत महिलांना बुरखा घालणे अनिवार्य केले होते. काबुलमधील स्त्रिया जरी काही माफक पाश्चात्य कपडे घालत असल्या तरी यापूर्वीच केस हिजाबने झाकून ठेवत आहेत. तथापि, काबुलच्या बाहेर बुरखा सामान्यपणे वापरला जात आहे.