पुणे पालिकेचा नदीपात्रावर 24 तास “वॉच’

पुणे – चोरून, पहाटेच्या वेळी किंवा मध्यरात्री नदीपात्रात राडारोडा, कचरा टाकला जातो. यामुळे नदीप्रदूषणात भर पडत असून, आता या राडारोडा टाकणाऱ्यांवर महापालिकेचा 24 तास वॉच असणार आहे. राडारोडा टाकताना किंवा कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्याला जबरी दंड भरावा लागणार आहे.

महापालिकेकडून नदीपात्रात होणारे अनधिकृत वाहनपार्किंग आणि राडारोडाचे डंपिंग थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. यासाठी नदीपात्रात विशेष गाडीसह 24 तास सुरक्षा रक्षकांची नियुक्‍ती केल्याचे अतिक्रमण नियंत्रण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

शहरात होणाऱ्या बांधकामांचा राडारोडा चोरट्या पद्धतीने थेट नदीपात्रात आणून टाकला जातो. हा राडारोडा पावसाळ्यात नदीच्या पाण्यात जातो. त्यामुळे प्रदूषणात भर पडते.

या राडारोड्याची शास्त्रोक्‍त पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांकडून विल्हेवाट लावली जात नाही. ट्रकच्या सहाय्याने नदीपात्रात हा राडारोडा आणून टाकला की कोणाचेच लक्ष जात नाही, असा यांचा समज असतो. याशिवाय, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहनपार्किंग केले जाते. या वाहनातील गळणाऱ्या डीझेल, पेट्रोलमुळे नदीप्रदूषणात भरच पडते. ही रोखण्यासाठी महापालिकेकडून उपायोजना करण्यात आल्या आहेत.

शहरातील नदी पात्रात विविध ठिकाणी 55 सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच, क्षेत्रीय कार्यालयांनाही या प्रकारांवर आळा बसवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. तेथेही एक पथक तैनात करण्यात आले आहे. नदीपात्रात बेकायदेशीर वाहनपार्किंग केल्यास ते वाहन टो करून उचलून आणण्यात येऊन त्याला 5 ते 25 हजारांपर्यंत दंड लावण्यात येत असल्याचे जगताप यांनी सांगितले. आतापर्यंत 13 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. राडारोडा टाकणाऱ्यांवर तर थेट मोठीच कारवाई करण्यात येणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी या उपाययोजनां संदर्भात सूचना केल्या होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.