कराड – स्वच्छ कराड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. दोन महिन्यात या साथीने दोन बळी गेल्याची घटनाही घडल्या. पालिका प्रशासन मात्र याबाबत आमची जबाबदारी अंगणापर्यंतची असल्याचे सांगून हात वर करत आहे.
परंतु याच डेंग्यूच्या साथीने खुद्द कराड तालुक्याचे प्रांताधिकारी उत्तम दिघे हेही ग्रस्त असून त्यांच्यावर येथील ऍपल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याचे समजते. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभागी झालेल्या पालिकेने गत दोन वर्षात उत्तम कामगिरी करत केंद्र शासनाची बक्षिसे मिळवली.
यावर्षी झालेली अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे डेंग्यूच्या साथीने थैमान घातले. पालिका प्रशासन त्यावर उपाय म्हणून जंतूनाशक फवारणी करत असल्याचे सांगत आहे. परंतु वास्तविक पाहता डासांच्या वाढत्या प्रभावाने डेंग्यूच्या रूग्णांमध्ये वाढच होत असल्याचे समोर आले आहे.
येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय, खासगी रूग्णालय, कृष्णा हॉस्पिटल येथे अनेक रूग्ण उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये दोन बळीही गेले. त्यानंतर पालिका प्रशासन व नागरी आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत जनजागृती सुरू केली. तसेच सर्वेक्षण मोहीमही युद्धपातळीवर सुरू ठेवली.
त्यामध्ये अनेक घरांमध्ये फ्रीजच्या ट्रेमध्ये डेंग्यूच्या आळ्या सापडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालिकेने अंगणापासून आतील जबाबदारी नागरिकांची असल्याचा जावईशोध लावत हात वर केले. पण सध्या डेंग्यू साथीने दस्तुरखुद्द प्रांताधिकारी आजारी असल्याने त्यांना नक्की कोणत्या कारणामुळे डेंग्यू झाला असेल याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.