पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींची संख्या वाढावी यासाठी महापालिकेच्या वतीने दहा वर्षांपासून महिलांसाठी 50 टक्के सामान्य करात सूट दिली जात आहे. तरीही मिळकत कर भरलेल्या महिलांची संख्या केवळ 2.43 टक्के एवढीच असून 2021-22 या वर्षात महिलांच्या नावे असलेल्या मालमत्ता करातून केवळ दोन कोटी रुपये जमा झाले आहेत.
शहरात एकूण 5 लाख 71 हजार मिळकत धारक आहेत. त्यातील 3 लाख 79 हजार 938 जणांनी 633 कोटी रुपये कर भरला आहे. त्यात केवळ 7 हजार 992 महिलांचा समावेश आहे. त्यांनी 2 कोटी 2 लाख रुपये कर भरला आहे.
महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकत कराच्या सामान्य करात 2011-12 पासून 50 टक्के सवलत दिली जात आहे. गेल्या 10 वर्षांत महिलांच्या नावाने असलेल्या मालमत्तांमध्ये अद्याप म्हणावी तशी वाढ झालेली नाही. 2021-22 मध्ये 7 हजार 992 महिलांनी लाभ घेतला असून त्यातून 2 कोटी 2 लाख रुपये महापालिकेला मिळाले आहेत. सवलतीचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी अर्ज करावा लागतो. 2022-23 मध्येही ही सवलत कायम ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एकाच मिळकतीला महिलांना याचा लाभ मिळतो. महिलांनी महापालिकेकडे विहित नमुन्यानुसार अर्ज करावा, तसेच नागरिकांनी महापालिकेच्या मालमत्ता कर सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मानसिकता बदलण्याची गरज
शहरात आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांची संख्या वाढत आहे. शहर परिसरात आयटी क्षेत्रासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अद्यापही केवळ महिलांच्या नावाने मिळकत असावी, अशी मानसिकता यातून दिसत आहे. बहुतेक कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघेही अर्थार्जन करतात. परंतु मिळकतीच्या स्वामिनी होण्याचा मान अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
महिलांनी आर्थिक दृष्ट्या सबल व्हावे, या उद्देशाने ही योजना 2011-12 मध्ये सुरू करण्यात आली आहे. यातून महिलांचे सबलीकरण व्हावे, या उद्देशाने त्यांना निवासी मिळकत करातील सामान्य करात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. ही सवलत एकाच मिळकतीला मिळेल. ऑनलाइन भरणा केल्यास 5 ते 10 टक्के सूट दिली जाते. व मुदतीपूर्वी बिलाचा भरणा केल्यासही मोठी सूट दिली जाते.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग