- पाठींच्या आजारांसह अपघाताचे प्रमाणही वाढले
पिंपरी – शहरातील खड्यांनी दुचाकींचा अक्षरशः खुळखुळा होत आहे. मोपेडसह दुचाकींना फोर्कआऊट येत आहेत, तर दुचाकीचे शॉकऑब्झर्व्हर खराब होत आहेत. केवळ खराब रस्त्यांमुळे दुचाकींची दुरुस्तीची कामे निघत आहेत. गाडी दुरुस्तीसाठी महिन्याला हजार-दीड हजारांचा फटका बसत आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना पाठदुखीचे आजार जडत असून छोट्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती लवकर होणे गरजेचे आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर पूर्वी सायकलींचे आणि दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जायचे. यंदाच्या वर्षी करोनामुळे पावसाळ्यापूर्वी आणि आता पावसाळ्या नंतरही महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने लक्ष न दिल्याने अगदी वर्षापूर्वी केलेले रस्ते खड्यात गेले आहेत. शहरातील सुमारे एक-दोन किलोमीटरचा सलग रस्ताही खड्याविना नाही. वर्षभरापूर्वी नव्याने बनविलेल्या रस्त्यांना खड्डे पडलेच कसे, याचेही ऑडिट होणे गरजेचे आहे. नव्या डांबरीकरणाच्या रस्त्यावरही विद्युत केबल, ड्रेनेज लाइन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी किंवा जलवाहिनी टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदाई केली आहे. त्यामुळे नवे रस्तेही खड्यात गेले आहेत.
उपनगरातून शहरात येणाऱ्या मोपेडला फोर्कआऊट आले आहेत. शॉकऑब्झर्व्हर खराब होत आहेत. रस्त्यावर दुचाकी मिनिटा मिनिटाला खड्ड्यात जात असल्यामुळे शॉक ऑब्झर्व्हरची कामे निघत आहेत. खड्डेमय रस्त्यातून जात असल्यामुळे अनेकांना पाठीचे आजार जडले आहेत. तर खड्डे आणि त्यातील माती त्यामुळे दुचाकी घसरून होणाऱ्या अपघातामध्ये वाढ झाली आहे.
दत्तात्रय जाधव, मॅकेनिक
खड्ड्यांमुळे दुचाकीची दुरुस्ती वारंवार करावी लागते. बुशींगसह इतर सुटे भाग खराब होत असल्यामुळे ग्राहकांनाही भुर्दंड बसत आहे. दुरुस्तीच योग्य झाली नाही, असाही आरोप ग्राहक करतात. मात्र त्यांनी प्रत्यक्षात खराब सुटे भाग पाहिल्यानंतर त्यांना विश्वास बसतो.
दीपक काची, मॅकेनिक