कुपवारा – जम्मू काश्मीरच्या माचिल भागात आज सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये एक लष्करी अधिकारी आणि तीन जवान शहिद झाले. तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आज सकाळी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या चकमकीला सुरवात झाली. त्यानंतर त्यात लष्करही सहभागी झाले.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सीमेपलिकडे सुमारे साडे तीन किलोमिटर अंतरावर संशयास्पद हालचाल दिसली. त्यावेळी सुरवातीला दोन्ही बाजूने गोळीबार करण्यात आला. त्यात सीमा सुरक्षा दलाचे जवान सुदीप सरकार शहिद झाले. यावेळी एक दहशतवादीही मारला गेला. त्यावेळी लष्कराचे पथकही तेथे पाठवण्यात आले.
सकाळी 10 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास आणखी काही घुसखोर नियंत्रणरेषे पासून सुमारे दीड किमी अंतरावर दिसले. त्यावेळी दोन्ही बाजूने तुफानी गोळबिार झाला, असे लष्कराच्या प्रवक्तयाने सांगितले.
या चकमकीमध्ये आणखी दोन दहश्तवादी मारले गेले. त्याच्या जवळून एके रायफल आणि दोन बॅगाही आढळून आल्या आहेत. या चकमकीमध्ये सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान आणि कॅप्टन हुद्दयावरील एक अधिकारीही शहिद झाला. या चकमकीमध्ये तीन जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असेही संरक्षण प्रवक्त्याने सांगितले.