पिंपरी – नाट्यमय आणि धक्कादायक पद्धतीने राज्य पातळीवर राजकीय घडामोडी होत आहे. या घडामोडींमुळे शहरातील राजकीय समीकरणे देखील बदलत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बॅकफूटवर गेलेल्या भाजपाला राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकींपासून मिळत असलेले बळ या घडामोडींमुळे वाढतच चालले आहे. राज्यात मविआचे सरकार आल्यानंतर शहरातील सत्तेची बलस्थाने देखील बदलली होती. आता पुन्हा भाजपच्या नेत्यांचे हात बळकट होताना दिसत आहेत. विशेषतः शहर भाजपाचे अध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे राजकीय वर्चस्व वाढताना दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपचे सरकार पुन्हा येणार आणि लांडगे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार अशा चर्चांना उधाण आले होते. सोशल मीडियावर महेश लांडगे मंत्री होणार असल्याच्या पोस्टही वाऱ्यासारख्या फिरु लागल्या होत्या. अचानकच फडणवीसांनी घोषणा केली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आहेत. यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले होते. परंतु एक चर्चा जोर धरु लागली की भाजपने मंत्रीमंडळात जर काही आमदारांना स्थान दिले तर महेश लांडगे यांची वर्णी नक्कीच लागू शकते.
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघांमध्ये 12 ठिकाणी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या विचारांचे आमदार आहेत. 9 ठिकाणी भाजपाच्या विचारांचे आमदार असले तरी, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार, शिक्षण संस्थांवर राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात भाजपाचा प्रभाव वाढवायचा असेल, तर मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोडीचा नव्या दमाच्या आणि लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या चेहऱ्याची भाजपाला नितांत आवश्यकता आहे.
सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव सर्वाधिक दिसतो. या भागात देवेंद्र फडणवीस सर्वाधिक लक्ष केंद्रीत करतील. भाजपा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील घराघरांत भाजपाचा विचार रुजवण्यासाठी फडणवीस त्याच ताकदीच्या चेहऱ्याला मंत्रीमंडळात स्थान देतील, हे निश्चित आहे.
सध्यस्थितीला पुणे जिल्ह्यातील प्रदेशाध्यक्ष, कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची नावे चर्चेत आहेत. राजकीय पटलावर संबंधित तिघांचा तुलनात्मक विचार होणार यात शंका नाही. त्यानिमित्ताने कोणाची बलस्थाने आणि आव्हाने काय आहेत? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न फडणवीस करतील, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.
कट्टर समर्थक, मोठा प्रभाव
पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदार संघातून 2014 मध्ये अपक्ष निवडून आले आहेत. 2019 मध्ये भाजपाच्या तिकीटावर राज्यातील भाजपा आमदारांमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका विजयात मोलाचे योगदान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अशी भाजपात ओळख आहे. बैलगाडा शर्यत, इंद्रायणी थडी जत्रा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आदींमुळे महाराष्ट्रभरात लोकसंपर्क आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नातीगोती आणि कामगार संघटनेच्या माध्यमातून मावळ, खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, मुळशी, हवेली आदी तालुक्यांमध्ये प्रभाव असलेले नेता म्हणून ओळखले जातात. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पक्षामध्ये कोणताही गॉडफादर नाही. स्वयंभू राजकीय वाटचाल असल्यामुळे कोणत्याही बड्या नेत्याचा वरदहस्त किंवा कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नाही.