शास्तीकराच्या आंदोलनामुळे भोसरी विधानसभेतील राजकीय वातावरण तापले

राष्ट्रवादीचे उमेदवार की अपक्ष?

विलास लांडे यांनी अद्याप कोणत्या पक्षाकडून लढणार हे जाहीर केलेले नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीची उमेदवारी घेणार की अपक्ष लढणार हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लांडगे यांच्या विरोधातील सर्वांची मोट बांधताना ते कोणत्या चिन्हावर लढणार हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. दत्ता साने यांनी महेश लांडगे यांचा पराभव करण्याचा चंग बांधल्यामुळे विलास लांडे यांना ताकद मिळणार आहे.

पिंपरी  – शहरातील मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या विलास लांडे यांनी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना हाताशी धरून शास्तीकराच्या माध्यमातून आंदोलन उभे करत विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. लांडे यांनी नाही-नाही म्हणत विधानसभेच्या तयारीला सुरुवात केल्यामुळे भोसरी विधानसभेतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच दत्ता साने आणि विलास लांडे एकाच व्यासपीठावर दिसू लागल्याने भोसरीतील लढत चुरशीची होणार हे देखील अधोरेखित झाले आहे.

हवेली मतदारसंघातून 2004 साली विजयी झाल्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या भोसरी विधानसभेचे पहिले आमदार होण्याचा मान विलास लांडे यांनी पटकाविला. तत्कालीन निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय खेचून आणला होता. यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पहावा लागला होता. गतवेळच्या निवडणुकीतील मोदी लाट, अपक्ष म्हणून महेश लांडगे यांनी निवडणुकीत मारलेली बाजी आणि राष्ट्रवादतील स्वकीयांनीच लांडे यांच्या पराभवासाठी लावलेला हातभार ही प्रमुख कारणे लांडे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती. त्यातच अतिआत्मविश्‍वासही लांडे यांना नडला होता.

यावेळी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण इच्छुक नसल्याचे लांडे यांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र कार्यकर्त्यांचा रेटा, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील लाट आणि शहरातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना आलेले अपयश या मुद्यांच्या माध्यमातून लांडे पुन्हा निवडणुकीच्या तयारी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. शास्तीकर, रेडझोन, रिंगरोड, बफर झोन, अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के परतावा यासह अनेक प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र यातील कोणताही प्रश्‍न सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना यश न आल्याचा मुद्दा विलास लांडे यांनी लावून धरत महापालिकेवर नुकताच मोर्चा काढला होता. हा मोर्चा काढताना त्यांनी सर्वपक्षीयांनाच या मोर्चात सहभागी करून घेण्याची भूमिका घेतली, त्यामुळे हा मोर्चा यशस्वी झाला.

शहरातील न सुटलेले प्रश्‍न हा मुद्दा महत्त्वाचा असताना भोसरीतील प्रमुख विरोधक असणाऱ्या महेश लांडगे यांच्या बाबतीतही त्यांनी उघड भूमिका घेतल्याने लांडगे यांच्यावरील नाराजीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांतील आमदारांचा कारभार आणि मी आमदार असताना दहा वर्षे केलेला कारभार याची जनतेनेच तुलना करावी, असे आवाहन करून त्यांनी आमदार लांडगे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. “डल्लामार’ कारभारापेक्षा जनतेच्या हिताला महत्त्व देण्याची भूमिका घेतल्याचे सांगत त्यांनी विधानसभेची तयारी चालविली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)