वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड

निगडी पोलिसांची कामगिरी : चोरीचे मोबाईल व सहा दुचाकी हस्तगत

पिंपरी – निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी करणाऱ्या विविध गुन्हयातील तीन आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्या तिघांकडून चोरीच्या दुचाकी, मोबाईल आणि अन्य एकाकडून 16 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या सर्वांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीबाबत तपास सुरु असल्याची माहिती निगडीचे वरिष्ठ निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिली.

मोबाईल चोरी प्रकरणी अजय अनिल साबळे (वय 20, रा. अजंठानगर, चिंचवड) याला अटक केली आहे. मोहमद शेख याच्या घरातून त्याच्या मित्रांचे सहा मोबाईल फोन चोरीला गेले होते. साबळे हा चोरीचा मोबाईल वापरत असल्याची माहिती कर्मचारी सतीश ढोले यांना मिळाली. त्याचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले. साबळे याने त्याच्या अन्य दोन साथीदारसमवेत चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्या तिघांकडून 68 हजारांचे 8 मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याचप्रमाणे पोलिस कर्मचारी रमेश मावसकर यांनी भक्‍ती-शक्‍ती चौकात तीन अल्पवयीन मुलांना संशयावरुन ताब्यात घेतले. त्या तिघांकडून निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, चिखली आणि कोंढवा या परिसरातून चोरी केलेल्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

सांगलीतून हस्तगत केला डंपर

त्याच बरोबरच 9 जुलैला ओटास्कीम येथून सहा लाखाचा डंपर चोरीला गेला होता. हा डंपर पोलिसांनी सांगली येथून हस्तगत केला आहे. पोलीस कर्मचारी किशोर पढेर आणि विलास केकाणे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत नरसोबाची वाडी, सांगली येथून डंपर हस्तगत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी विजय मारुती पवार (रा. आष्टी, बीड) याला अटक केली आहे. त्याचप्रमाणे मंटू चंद्रभूषण पासवाण (वय 46, रा. आझाद चौक, निगडी) याच्याकडून 16 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. निरीक्षक राजेंद्र निकाळजे, सहायक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर कोकाटे, कर्मचारी विलास केकाणे, प्रविण मुळूक, विनोद होनमाने, विजय बोडके, राहुल मिसाळ, सोमनाथ दिवटे, मितेश यादव या पथकाने कारावाई केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.