‘मीना’वरील पेशवेकालीन बंधारा धोकादायक

खोडद – आर्वी, गुंजाळवाडी परिसरात असलेल्या मीना नदीवरील पेशवेकालीन दगडी बंधारा (धरण) संरक्षक कठड्याचे पाइप व लोखंडी ढापे भंगारवाल्यांनी चोरून नेल्यामुळे हा पेशवेकालीन बंधारा धोकादायक झाला असून हे प्राचीन धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना असुरक्षित ठरत आहे.

मीना नदीवर 1872मध्ये आर्वी, गुंजाळवाडी गावाजवळ पेशव्यांनी 600 मीटर लांब व 20 फूट रुंद मोठा दगडी बंधारा बांधला होता. या बंधाऱ्याच्या पाण्यावर आजूबाजूच्या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती करत होते; परंतु 35 वर्षांपूर्वी म्हणजे 1983-84 ला अतिवृष्टी होऊन वडाज धरण क्षमतेपेक्षा जास्त भरू लागल्यामुळे कुकडी पाटबंधारे विभागाकडून वडज धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यापने हा बंधारा फुटला. त्यामुळे गुंजाळवाडी, चिमनवाडी परिसरातील अनेक शेतजमीन वाहून गेली व जवळच असलेल्या नारायणगाव शहरात पाणी घुसले होते. त्यानंतर या जागी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासारखे बांधकाम करून कुकडी पाटबंधारे विभागाने या दगडी बंधाऱ्याला असलेल्या दोन लहान दरवाज्यांऐवजी लोखंडी ढापे टाकले. व या बंधाऱ्याच्याकडेला सुरक्षिततेसाठी लोखंडी खांब (रेलिंग) बसवलेले; परंतु आता पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे हा ऐतिहासिक पेशवेकालीन बंधारा दुर्लक्षित झालो असून लोखंडी कठडे गायब झालेले आहेत. ढापे गंजले असून अनेक ढापे व लोखंडी पाइप चोरी गेलेले आहेत. त्याचबरोबर धरणाच्या मुख्य भिंतीवर झाडे, झुडपे वाढून त्याच्या मूळ्या बंधाऱ्याच्या दगडी भिंतीत शिरू लागल्या आहेत. बंधाऱ्या आतील बाजूस नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साठून झाडे, झुडपे वाढली आहेत. या धरणाकडे पाटबंधारे विभागाने त्वरित लक्ष देऊन याची डागडुजी करावी, धरणातील गाळ, भिंतीवरील झाडे-झुडपे काढावी, अन्यथा अतिवृष्टी झाल्यास पुन्हा हे धरण फुटून 35 वर्षांपूर्वी आलेल्या पुराची परिस्थिति निर्माण होईल, असे नागरिकांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.