कुकडीसह घोड धरणांतून आवर्तन सोडा

श्रीगोंदा तालुक्‍यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून स्वतंत्र मागणी

श्रीगोंदा – कुकडी व घोड धरणांत पाण्याची मोठी आवक सुरू आहे. त्यातच तालुक्‍यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांपुढे पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. यावर पर्याय म्हणून घोड व कुकडी धरणांतून कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार राहुल जगताप यांनी स्वतंत्रपणे केली आहे.

या संदर्भात पाचपुते व जगताप यांनी वेगवेगळी प्रसिद्धी पत्रके प्रसिद्धीस दिली आहेत. पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कुकडी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने कुकडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. तसेच घोड धरणातही पाण्याची आवक चांगली सुरू झालेली आहे. त्यामुळे कुकडी व घोड धरणातून कॅनॉलद्वारे त्वरित पाणी सोडण्याची मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. कुकडी व घोड धरणांतून तातडीने पाणी सोडल्यास लाभ क्षेत्रातील विसापूरसह, छोटे, मोठे तलाव, बंधारे भरून घेण्यास मदत होणार आहे. आज रात्रीनंतर घोड धरणामध्ये सुद्धा पाण्याची आवक वाढेल. त्यानुसार घोड धरणातूनही आवर्तन सोडण्यात यावे.

आमदार राहुल जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कुकडी प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला आहे. घोड धरणात मात्र आत्ता कुठे उपयुक्त पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. या स्थितीत तालुक्‍यासह कुकडी लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे कुकडीतून शेतीचे आवर्तन सुरू करतानाच डिंभेतून घोडसाठी काही पाणी सोडून घोडचेही आवर्तन सुरु करण्याबाबत प्रयत्नशिल असून, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री राम शिंदे व गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून आवर्तनाचा निर्णय घेण्याची मागणी करणार आहे. कुकडी व घोडखालील शेती निसर्ग कोपल्याने अडचणीत आली आहे.

उसाचे पीक तर गेलेच आहे. शिवाय फळबागांनाही फटका बसला आहे. आज कुकडीत 43 टक्के उपयुक्त पाणी आहे. म्हणजेच जवळपास चौदा टीएमसी पाणी आहे. त्यामुळे लाभक्षेत्राला न्याय देतानाच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरु होण्यासाठी आवर्तन सोडणे आवश्‍यक आहे. त्याचवेळी घोड धरणाचा पाणीसाठा वाढविण्यासाठी डिंभेतून घोडला पाणी दिले, तर पावसाच्या पाण्यात याचा उपयोग होऊन घोडची पाणीपातळी चांगली होऊन तेथूनही शेतीचे आवर्तन सुरु होईल. घोडखाली गेली सहा महिने पाणी नसल्याने तेथील अडचणी गंभीर आहेत. याबाबत मंत्र्यांना आपण समक्ष भेटून दोन्ही प्रकल्पांच्या आवर्तनाची मागणी आजच करणार आहोत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)